
सावर्डे : कृत्रिम बुद्धिमत्ता रोजगार हिरावणारे नसून नवनवीन संधी उपलब्ध करून देणारे आहे. मुलांचा या क्षेत्राकडे कल वाढण्यासाठी आपल्या नियमित अध्यापनामध्ये या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे .अतिशय कमी कालावधीत कीचकट विषय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो ,असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांनी केले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये स्वर्गीय विद्या सुर्वे स्मृती व्याख्यानमाले अंतर्गत शिक्षकांसाठी तंत्रस्नेही शिक्षण म्हणजेच शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर या महत्त्वपूर्ण विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . या कार्यक्रमासाठी मुख्य व्याख्याते विवेक सावंत आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे कार्यकारी संचालक अमित रानडे, संस्थेचे सचिव महेश महाडिक ,सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम ,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे ,उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर ,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनीतकुमार पाटील ,सह्याद्री पॉलिटेक्निकचे प्राचार्य मंगेश भोसले इत्यादी मान्यवर व 98 अध्यापक उपस्थित होते.
कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन अध्यापनासाठी अतिशय उपयुक्त असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्या मध्ये विकास होताना आढळतो, त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन विवेक सावंत यांनी केले. महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे कार्यकारी संचालक अमित रानडे यांनीही शिक्षकांनी अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे प्रत्यक्ष चित्रफितीच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना अवगत केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेश गंगावणे यांनी केले.