
सावंतवाडी : सफाई कामगारांना त्यांचे मूलभूत हक्क मिळालेच पाहिजेत. मी त्यांच्या नेहमीच पाठीशी आहे. मात्र, शहरातील ४० हजार करदात्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे हे देखील नगरपरिषदेचे कर्तव्य आहे. काम बंद आंदोलनाद्वारे जनतेला वेठीस धरण्याचे काम काही मंडळी करत आहेत, हे योग्य नाही. त्यांनी कायदेशीर मार्गाने आपला लढा लढावा असे मत माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले आहे.
सावंतवाडी शहरातील आपल्या संपर्क कार्यालयात उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सफाई कामगारांच्या सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांचे काही सहकारी काम बंद आंदोलन करून शहरातील नागरीकांच्या आरोग्याशी खेळत असून शहराला वेठीस धरत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत बंटी पुरोहित उपस्थित होते. कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे पैसे मिळायलाच हवेत, ते त्यांचा हक्क आहेत आणि या मागणीला आपला पूर्णपणे पाठिंबा आहे. मात्र, काम बंद आंदोलन करून शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळणे आणि त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. मी नेहमीच कामगारांच्या पाठीशी राहिलो आहे. कामगारांचा पगार कोणाच्या फोनमुळे काढण्यात आला, याची आधी माहिती घ्या, असा सल्ला देखील त्यांनी बबन साळगावकर यांचे नाव न घेता दिला.
त्याचप्रमाणे कामगारांची ६५ लाख रुपयांची थकबाकी ठेकेदाराने द्यावी हे योग्यच आहे. पण, आरोप करणाऱ्यांचे दावे खरे आहेत का ? याची खात्री केली पाहिजे. कामगारांचे पैसे त्यांना कायदेशीर मार्गाने मिळायला हवेत. मात्र, जनतेने नाकारलेले काही नेते पुन्हा जनतेत सक्रिय होण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही परब यांनी केला. नगरपरिषदेने नेमलेले ठेकेदार हे जरी बाहेरचे असले तरीही प्रत्यक्ष सेवा पुरविणारे पोट-ठेकेदार मात्र स्थानिकच आहेत. त्यामुळे त्यांना देखील स्थानिक कामगारांची व्यथा माहिती असायला हवी. जर ठेकेदाराकडून कामगारांवर अन्याय होत असेल तर कामगारांचे थकित वेतन ज्या प्रमाणे आमच्या नेत्यांच्या माध्यमातून अदा करायला भाग पाडले तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यासाठीही मी स्वतः पुढाकार घेईन, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.