सिंधुदुर्ग : 'घुंगुरकाठी' संस्थेने निर्मिती केलेल्या, डॉ. सई लळीत यांच्या मालवणी कवितांवर आधारित नाट्याविष्काराच्या 'भावबंध कोकणचे' या कार्यक्रमाने गोमंतकीय रसिकांची मने जिंकली. हा कार्यक्रम नुकताच पणजी, गोवा येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या अद्ययावत प्रेक्षागृहात रसिकांच्या उपस्थितीत रंगला. गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार वामन प्रभू यावेळी आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमातील कविता, संहितालेखन, निवेदन आणि दिग्दर्शन डॉ. सई लळीत यांचे आहे. निवेदनानंतर कलाकार कविता सादर करताना रंगमंचावर त्या कवितेचा नाट्याविष्कारही सादर होतो. या कार्यक्रमात निलेश पवार, सुप्रिया प्रभुमिराशी, मंगल राणे, डॉ. संदीप नाटेकर, राकेश काणेकर, श्रेयश शिंदे, सत्यवान गावकर, सिद्धी वरवडेकर, विशाल गुरव, प्रमोद कोयंडे, तृप्ती भोगले, श्रद्धा परब आणि दशावतारी कलावंत नारायण आईर या तेरा कलाकारांचा सहभाग होता. कार्यक्रमाची निर्मिती 'घुंगुरकाठी'चे सतीश लळीत यांची आहे.
इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, सदस्य सचिव अशोक परब यांचे सहकार्य या कार्यक्रमाला मिळाले.