महिलांनी क्षमता ओळखून स्वत:ला सिद्ध करावे ! प्रा. आनंदी घोगळे

Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: March 11, 2023 17:09 PM
views 245  views

देवगड : नारी शक्तीची ताकद प्रचंड आहे. आजची स्त्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. आज देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि राजकीय अशा सर्व स्तरांवर महिला आघाडीवर आहेत. महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. तरच समाज आपल्याला मानसन्मान देईल, असे प्रतिपादन टोपीवाला अध्यापक विद्यालय मालवणच्या प्राध्यापिका आनंदी घोगळे यांनी तळेबाजार येथे व्यक्त केले.

तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी वक्त्या म्हणून प्रा. घोगळे बोलत होत्या. प्रा. घोगळे यांनी स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्रियांचे कर्तृत्व यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. घोगळे पुढे म्हणाल्या, अनादी काळापासून महिलांना स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीसाठी शिवबा घडविला. छत्रपती संभाजी महाराजांनंतर महाराणी ताराराणी यांनी स्वराज्य टिकवून ठेवले. झाशीची राणी लक्ष्मीबाई,  अहिल्याबाई होळकर अशा अनेक रणरागिनींनी आपापल्या पद्धतीने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या त्यागाला कोणीही नाकारू शकत नाही. तोच वसा आणि वारसा घेऊन मार्गक्रमण करण्यासाठी महिलांनी सज्ज राहावे, असा भावनिक सल्लाही प्रा. घोगळे यांनी दिला.

दरम्यान शाळेच्या वतीने प्रा. घोगळे यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक विभागप्रमुख मृण्मयी जाधव - तांबे यांनी प्रा. घोगळे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आणि त्यांच्या कामाबद्दल कौतुक केले. आपल्या विभागातील एक स्त्री चांगल्या प्रकारे शैक्षणिक क्षेत्रात काम करत असून सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक नंदन घोगळे, इतर सहकारी शिक्षक होते.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ. नाईक यांनी केले तर आभार सौ. परब यांनी मानले.