कार्यशाळेतून महिला बचत गटांनी भविष्यातील योग्य दिशा निश्चित करा : मनिष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँक व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पुणे यांच्यामार्फत महिला बचत गटांसाठी ई - कॉमर्स व्यवसाय कार्यशाळेचा शुभारंभ
Edited by: दिपेश परब
Published on: February 10, 2024 08:58 AM
views 115  views

सिंधुदुर्ग | दिपेश परब : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात महिला बचत गट खूप मोठे काम करत आहेत. आज बदलत्या परिस्थितीमध्ये महिला बचत गटांचे अनेक व्यवसाय उभे आहेत. लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण असे वेगवेगळे महिला बचत गटांचे व्यवसाय बघताना मनाला समाधान वाटते. बदलती मानसिकता सर्व गटांनी स्वीकारली याचे समाधान आहे. म्हणून या जिल्ह्यातील महिलांना योग्य प्रशिक्षण असलं पाहिजे यासाठी त्यांच्या व्यवसायाला लागणारे अर्थसहाय्य, व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन व उत्पादित मालाला मार्केटिंगद्वारे योग्य भाव मिळवून देणे हे बँकेचे प्रयत्न आहेत. म्हणून या प्रशिक्षणातून भविष्यातील योग्य दिशा निश्चित करा असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी ओरोस येथे केले. 

सिंधुदुर्ग जिल्हा बँक व रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पुणे यांच्यावतीने येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनाच्या सभागृहात महिला बचत गटांसाठी ई- कॉमर्स व्यवसाय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनिष दळवी बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक संचालक गजानन गावडे, प्रज्ञा ढवण, भाजपच्या श्वेता कोरगावकर, रेखा गायकवाड, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, प्रबोधिनीचे कार्यकारी अधिकारी राहुल टोकेकर, प्रशिक्षक प्रवीण शिंदे, सूर्यकांत म्हाडे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. 

यावेळी पुढे बोलताना मनिष दळवी म्हणाले की, या राज्यात या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सारखे दुसरं कोणतेही प्रशिक्षण केंद्र नाही. भविष्यात या जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात पाठवण्याची व्यवस्था बँकेमार्फत करण्यात येईल. आता डिजिटल जमाना आहे, प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. याचा उपयोग फक्त मॅसेज पाठवण्यासाठी न करता व्यवसाय वाढीसाठी कसा करावा याची माहिती या प्रशिक्षणातून तुम्हाला मिळेल. एमएसएमइ, राज्य, केंद्र शासन, महामंडळ यांच्या विविध योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्हावासीयांना देण्याचा प्रयत्न जिल्हा बँक करत आहे. व्याजावर व्यवसाय उभा करणे व बचगटाचे उत्पन्न वाढवणे यातून गटांनी बाहेर यायला हवे. पुढच्या काळात शेती पूरक व्यवसायामध्ये खूप संधी आहे. याचे योग्य इ मार्केटिंग केल्यास तुम्ही कानाकोपऱ्यातून असाल तिथे ग्राहक तुमच्यापर्यंत येईल असेही श्री दळवी म्हणाले. 

आपल्या जिल्ह्यात ४३२ पेक्षा जास्त उमेदचे ग्रामसंघ आहेत. प्रत्येक ग्रामसंघाकडे १५ ते २० महिला बचत गट आहेत व त्यांचे अत्यंत शिस्तबद्ध काम सुरू आहे. महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही सत्याने प्रयत्न करत आहोत. आजच्या या प्रशिक्षण वर्गानंतर या जिल्ह्यात वेगळे प्रयोग होतील. भविष्यातील समाजकारण व राजकारण महिला बचत गटांचे असणार असे यावेळी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी बोलताना सांगितले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष यांनी बोलताना या प्रशिक्षणातून सर्व भगिनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या बचतगटाच्या उत्पादनाचे चांगले मार्केटिंग करू शकतील असा विश्वास व्यक्त केला. तर गेल्या ४० वर्षांपासून ही प्रबोधिनी सातत्याने कार्य करत आहे. महिलांनी चाकोरी बाहेरचा विचार करावे. इ कॉमर्स हे तंत्र अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे प्रबोधिनीचे कार्यकारी अधिकारी राहुल टोकेकर यांनी सांगितले.