
दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित झाले आहे. तब्बल ३ वर्षांच्या प्रशासक काळानंतर आता पुन्हा एकदा पंचायत समितीवर महिला सभापती विराजमान होणार आहेत.
सन 2022 मध्ये शिवसेनेच्या संजना कोरगावकर या शेवटच्या सभापती होत्या. त्यानंतर तीन वर्षे समितीवर प्रशासक नेमण्यात आला होता. आता पुन्हा एकदा महिला सभापती निवडली जाणार असल्याने दोडामार्गच्या राजकीय क्षेत्रात नव्या चेहऱ्यांबाबत चर्चेला उधाण आले आहे. गेल्या ३ वर्षात अनेक महिला भाजपा, सेना व उबाठा मधून राजकीय क्षेत्रात सक्रिय झाल्या असल्याने इथेही चुरस होण्याची शक्यता आहे.
दोडामार्ग पंचायत समिती स्थापन झाल्यानंतर सन 2002 मध्ये शिवसेनेच्या प्रज्ञा नाईक या पहिल्या महिला सभापती म्हणून विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर आजपर्यंत एकूण नऊ महिला सभापतींनी या पदाची जबाबदारी सांभाळली आहे.
आता पुन्हा एकदा महिला सभापती पद आरक्षित झाल्याने खुल्या प्रवर्गातून सभापती पदावर विराजमान होण्यासाठी महिला नशीब आजमावणार आहेत. मात्र पंचायत समितीच्या ६ पैकी ३ महिला मतदार संघ कोणते आरक्षित होतात यावर सुद्धा अनेकांचे मनसूबे अवलंबुन राहणार आहे. मात्र तरीही सभापती पद नारिशक्ती व ते ही खुल्या प्रवर्गात राखीव असल्याने यावेळी दोडामार्ग पंचायत समितीत महिला सत्तेचा डंका पुन्हा एकदा वाजणार आहे.










