
रत्नागिरी : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज (PCOD) यासारख्या विकाराचे प्रमाण वाढत असून त्यामुळे महिलांच्यात मासिक पाळीमध्ये अनिश्चितता, वंध्यत्व,शरीरावर अतिरिक्त केस,वजन वाढणे, गर्भाधारणेतील अडचणी, ओटीपोटात वेदना, वाढते ब्लड प्रेशर,झोप न येणं, थकवा,डोकेदुखी आणि अचानक मूडमध्ये बदल यासारख्या समस्या भेडसावत असल्याने वेळीच या विकारासंदर्भात महिलांनी जागरूक राहून वैद्यकीय उपचार घेणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन डॉ.अक्षता शेंबेकर (होमिओपॅथिक फिजिशियन आणि क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट)यांनी केले.
सावर्डेमधील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयातील आय.क्यू.एस. सी. आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय 'PCOD Awareness Workshop' या कार्यशाळेप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी प्रा.जयसिंग चवरे यांनी डॉ.अक्षता शेंबेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
PCOD संदर्भात बोलताना डॉ. शेंबेकर पुढे असेही म्हणाल्या चुकीची जीवनशैली, तणाव, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार यामुळेच या विकाराचे प्रमाण महिलांमध्ये वाढत आहे याला नियंत्रणात आणण्यासाठी महिलांनी संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक स्वास्थ्य, साधी जीवनपद्धती आणि वेळेवर योग्य वैद्यकीय उपचार या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. तसेच सद्या या विकारासंदर्भात किशोरवयीन मुलींमध्ये जनजागृती होण्यासाठी शाळा व महाविद्यालयामधून कार्यशाळा, व्याख्याने आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे.या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ. दिप्ती शेंबेकर यांनी 'महिला विकास कक्ष' या विभागामार्फत महाविद्यालयात महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
या कार्यक्रमला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य टी वाय कांबळे, प्रा.जयसिंग चवरे, प्रा. सुनिल जावीर प्रा.संकेत कुरणे प्रा.अवनी कदम प्रा.पुजा आवले आदींचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिप्ती शेंबेकर यांनी केले तर आभार प्रा. पुजा आवले यांनी मानले