
सावंतवाडी : हिंदू नववर्षाची सुरुवात आणि गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तावर वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे एका चिमुकलीच्या आगमनाने आनंद द्विगुणित झाला आहे. 'महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८' च्या पथकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रुग्णवाहिकेतच एका महिलेची सुखरूप प्रसूती झाली.
आज सकाळी ८ वा. २२ मिनिटांनी १०८ नियंत्रण कक्षाला वायंगणी येथून एका गर्भवती महिलेसाठी आपत्कालीन कॉल प्राप्त झाला. यावेळी वेंगुर्ला येथील रुग्णवाहिका नुकतीच गोवा-बांबोळी येथील ड्युटीवरून परतली होती. वेळ न घालवता रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाली. अवघ्या ८ मिनिटांत म्हणजेच ८ वा. ३० वाजता रुग्णापाशी पोहोचली.
रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि प्रसूती कळा तीव्र असल्याने महिलेला रुग्णालयात हलवणे शक्य नव्हते. अशावेळी वेंगुर्ला येथील ईएमएसओ डॉ. ज्ञानेश्वर पांचाळ आणि रुग्णवाहिका चालक साईसिद्धेश मेस्त्री यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जागीच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि चालकाच्या मदतीने ही प्रसूती यशस्वी पार पडली. मातेने एका गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला असून बाळाचे वजन २.४ किलो आहे. प्रसूतीनंतर माता आणि बालकाला पुढील उपचारांसाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, वेळेवर मदत मिळाल्यामुळे माझी पत्नी आणि बाळ सुरक्षित आहेत. १०८ मधील डॉक्टर आणि चालकाचे आम्ही मनापासून आभार मानतो अशा भावना रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या. जिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती होण्याची ही ४४७ वी घटना ठरली आहे. सण-उत्सवाच्या दिवशीही तत्परतेने सेवा बजावणाऱ्या या देवदूतांचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी घरात लक्ष्मी आल्याच्या भावनेने वायंगणी गावात आनंदाचे वातावरण आहे.










