
सावंतवाडी : गेले काही महिने असलेल्या आजारपणाला कंटाळून मळगाव येथील महिलेने घरालगत असलेल्या ओहोळात आत्महत्या केल्याचे उघडीस आले आहे. दिपाली दशरथ हरमलकर वय (५८ रा.मळगाव सावळवाडा ) असे तीचे नाव आहे. घटनास्थळी सावंतवाडी पोलिस दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पंचनाम्याअंती मृतदेह सावंतवाडी येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.
संबंधित महिला शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ओहोळाच्या दिशेने जात असलेली काही लोकांनी पाहिली होती. मात्र,ती काही कामानिमित्त जात असल्याचे त्यांना वाचल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला. त्यानंतर रात्री उशिरापर्यत ती घरी न परतल्याने घरच्या मंडळीनी तसेच शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरु केली. यावेळी मळगाव सावळवाडा येथील ओहाळावर घातलेल्या बंधाऱ्यालगत तिची चप्पल आढळून आली. मात्र,रात्री उशिर झाल्याने शोध घेण्यात यश आले नाही. दरम्यान रात्री उशिरा घरात तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत तिने आपण आजाराला कंटाळून आत्महत्या करीत आहे असे म्हटले असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु केल्यानंतर ओहोळातील एका झुडपाला अडकलेल्या स्थितीत संबंधित महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्या बाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना देण्यात आली. तिच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.