
वेंगुर्ला : वेंगुर्ला शहरातील बॅ खर्डेकर रोड या मुख्य रस्त्यावर रहाटाच्या विहिरी शेजारी असलेल्या मारुती मंदिर समोर असलेला विद्युत वाहिन्यांचा लोखंडी पोल हा रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यामुळे याठिकाणी जीवितहानी झाल्यानंतरच विद्युत वितरण विभागाला जाग येणार का ? असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.
मान्सून काही दिवसातच कोकणात दाखल होणार आहे. मात्र त्यापूर्वी अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वेंगुर्ला शहरासहित तालुक्यात गेले २ ते ३ दिवस जोरदार वारे वाहून विजांच्या कडकडाटासहित पाऊस होत आहे. यामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन जनजीवन विस्कळीत होत आहे. यातच विद्युत वितरणच्या गचाळ कारभाराचा फटकाही नागरिकांना सहन करावा लागत आहे. पावसापूर्वी सावधानता न बाळगल्याने व रस्त्यावर आलेली झाडे वेळेत तोडून न घेतल्याने वादळी पावसात ही झाडे विद्युत वाहिन्यांवर पडून तासंतास विद्युत पुरवठा खंडित होत आहे. याचा नागरिकांसहित रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, वेंगुर्ला शहरात हा विद्युत वाहिन्यांचा लोखंडी पोल रस्त्यावर वाकून रस्त्यावर आल्याने तो पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. यामुळे विद्युत वितरण विभागाने वेळीच याकडे लक्ष देऊन दुर्घटना टाळावी. याठिकाणी कोणतीही दुर्घटना झाल्यास त्याला पूर्णपणे विद्युत वितरण विभाग जबाबदार राहील अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.