नवे एसपी कणकवलीतले अवैध धंदे बंद करणार का?

कणकवलीकरांकडून व्यक्त होतेय अपेक्षा !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 27, 2022 15:34 PM
views 294  views

कणकवली : सिंधुदुर्गचे नवे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल हे कणकवलीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करणार काय? याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. कारण गेली कित्येक महिने कणकवली शहरात सोशल क्लबच्या नावाखाली जुगार अड्डे सुरु आहेत. अवैध दारूचीही मोठ्या प्रमाणात राजरोजपणे विक्री केली जाते. मटका, गुटखा, गांजा आणि वेश्या व्यवसाय देखील वाढत असल्याने या अवैध धंद्यांवर नवे पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी कारवाई करावी, अशीच एक अपेक्षा नव्या पोलीस अधीक्षकांकडून कणकवली नागरिक करत आहेत.  

पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी कणकवली पोलिस ठाण्याला भेट देऊन विविध गुन्ह्यांच्या तपासाबाबत आढावा घेतला. कणकवलीचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यातील कणकवली पोलिस ठाणे हे मोठे पोलिस ठाणे असून, येथील कामकाजाची माहिती घेत त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या. 

कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी कणकवली पोलीस स्थानकाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावरची धाड टाकली होती. त्यामध्ये पंधरा ते वीस मोटरसायकली, दोन चार चाकी गाड्या व लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. या कारवाईनंतर देखील कणकवलीमध्ये सोशल क्लबच्या नावाखाली जुगार अड्डे आणि अवैध व्यवसाय सुरूच आहेत. त्यामुळे नव्या पोलीस अधीक्षकांकडूनही कारवाईची मागणी होतेय.