महामार्गाचे काम पूर्ण होत नाहीत तोवर टोल वसुली करू देणार नाही - परशुराम उपरकर

महामार्गाचे काम पूर्ण होत नाहीत तोवर टोल वसुली करू देणार नाही - परशुराम उपरकर
Edited by:
Published on: November 10, 2022 12:07 PM
views 184  views

कणकवली : ओसरगाव येथील टोलनाक्यावरून टोल वसुली करण्यासंदर्भात निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. मात्र सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना सवलत तसेच इतर ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत तोवर टोल वसुली करू देणार नाही, असा इशारा मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे. तसेच सर्व पक्षीयांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. ओसरगाव येथील टोल नाक्यावर यापूर्वीही टोल वसुलीचा प्रयत्न सुरू झालेला होता. मात्र मनसेने याविरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवत टोल वसुली हाणून पाडली. त्यानंतर आता पुन्हा निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत सिंधुदुर्ग मधील पासिंगच्या गाड्यांना टोल सवलत मिळत नाही, तोवर टोल वसुली करू देणार नाही. तसेच रस्त्याचे जे काम अपूर्ण आहे ते शंभर टक्के पूर्ण झाले पाहिजे. तसेच अनेक ठिकाणी महामार्गावर अडथळे निर्माण केलेले आहेत. सर्विस रोड अपूर्ण आहेत. काही ठिकाणी काम होणे बाकी आहे. ही सर्व कामे टोल वसुली सुरू करण्याअगोदर पूर्ण झाली पाहिजेत. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने टोल नाक्यावर स्वच्छतागृहासहित ज्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे त्या सुविधाही उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे टोल वसुलीची कितीही टेंडर काढली तरी टोल वसुली सुरू करू देणार नाही असा इशारा श्री. उपरकर यांनी दिला आहे.


एकीकडे लोकांना मोबदला देणे बाकी आहे. रस्त्याची कामे अपूर्ण आहेत सर्विस रोड, गटार अर्धवट स्थितीत आहेत. असे असताना टोल वसुलीची घाई का? असा सवाल करत शासनाने कितीही प्रयत्न केले तरी मनसे टोल वसुली करू देणार नाही असा इशाराही श्री. उपरकर यांनी दिला आहे.