...तर केसरकर आता पट्टेरी वाघांना 'वनतारा'त पाठवणार का ? : डॉ. परुळेकर

Edited by: विनायक गांवस
Published on: October 04, 2025 13:32 PM
views 105  views

सावंतवाडी : केर येथे काल झालेल्या व्याघ्र दर्शनामुळे (पट्टेरी वाघाचे दर्शन) अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी दाभीळ येथे एका वाघिणीचा बुडून मृत्यू, त्यानंतर खडपडे येथे वाघाचे दर्शन, चौकूळ येथे सातत्याने दिसणारा पट्टेरी वाघ आणि गाई बैलांवर झालेले हल्ले आणि काल केर येथे रस्त्याशेजारी निवांत बसलेला वाघ ह्या सगळ्या बाबी सावंतवाडी दोडामार्ग सह्याद्री पट्ट्यात असलेले विपुल वन्यजीवन किती समृद्ध आहे ह्याची साक्ष देणारे आहे. पण तरीही आंबोली गेळे ते घारपी फुकेरी तांबोळी, असनिये, डेगवे या इको सेन्सिटिव्ह असलेल्या भागातून शक्तीपीठ महामार्ग रेटून नेण्याचा राज्यकर्त्यांचा दुराग्रह हास्यास्पद आणि दुर्दैवी आहे, असे मत उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.

डॉ. परुळेकर पुढे नमूद करतात की, अशा समृद्ध जैवविविधता आणि विपुल वन्यजीवन असलेल्या वाइल्डलाइफ काॅरिडाॅरमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून महामार्ग काढणे हे घातक आहे. आधीच विविध कारणाने या भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरूच आहे त्यामुळे गवारेडे सावंतवाडी सारख्या शहरांमध्ये पाळीव गाई म्हशींसारखे भरदिवसा दिसू लागले आहेत. आता वाघही अनेक ठिकाणी दिसत आहेत. हे भयावह आहे.

ओंकार हत्ती अनेक गावांमध्ये शेती बागायतीचे नुकसान करत असताना त्याला अंबानींच्या "वनतारा" मध्ये पाठवण्याचे प्रयत्न करत असलेले सावंतवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक केसरकर आता पट्टेरी वाघांना देखील तिथेच पाठवण्यासाठी प्रयत्न करणार काय? अशा रीतीने येथील वन्यजीवन सुरतला गेलेल्या आमदारांप्रमाणे गुजरातला वनतारामध्ये पाठवायला सुरुवात झाली तर राज्याचे आणि पर्यायाने जिल्ह वनखाते बंदच करायचं काय? जनतेचे कोट्यवधी रूपये ज्या वनखात्यावर खर्च होतात त्या खात्याची गरजच काय? अशी चर्चा सध्या सामान्य नागरिकांमध्ये होत आहे, असेही डॉ. जयेंद्र परुळेकर म्हणतात.