
सावंतवाडी : लोककला महोत्सव २०२५ ला मोठा प्रतिसाद मिळाला. गेली तीन वर्षे हा उपक्रम आम्ही घेत आहोत. दरवर्षी हा दशावतार महोत्सव आम्ही आयोजित करणार आहोत. दशावतार कलेत युवा कलावंत निर्माण व्हावेत यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, इतर लोककलांनाही व्यासपीठ देऊ असे प्रतिपादन युवराज लखमराजे भोंसले यांनी व्यक्त केले. सावंतवाडी राजघराण व श्री. पंचम खेमराज महाविद्यालय आयोजित लोककला महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
राजघराणं व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या लोककला विभागातर्फे लोककला महोत्सव २०२५ च आयोजन करण्यात आले होते. विधी संख्येत, नारायण नमोस्तूते, राखणदार, देवी चंद्रलांबा परमेश्वरी, गिधाड घुबड संग्राम, विजयमणी, मुंबईची मुंबादेवी आदी दशावतार नाट्यप्रयोग या निमित्ताने सादर झाले. रसिकांचा मोठा प्रतिसाद याला मिळाला. युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या संकल्पनेतून 'भरतनाट्यम' हा खास आविष्कार पार पडला. या माध्यमातून राजघराण्याचा राजमातांच्या पराक्रमाची गाथा सांगितली गेली. हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला.
मनोगतात युवराज लखमराजे पुढे म्हणाले, दरवर्षी असाच महोत्सव या ठिकाणी होईल. दशावतारासह इतरही लोककलांना न्याय देऊ असे मत व्यक्त केले. तसेच 120 दशावतार मंडळ जिल्ह्यात आहेत. नव्या पिढीची पावलं या कलेकडे वळत आहे. सात नामांकित दशावतार मंडळ या लोकोत्सवात सहभागी झाली होती. युवराज्ञींच्या संकल्पनेतून भरतनाट्यम आविष्कार साजरा झाला. येत्या काळात नवी पिढी लोककलेला कसं आत्मसात करेल यासाठी आपलं प्राधान्य राहील असं मत श्री. भोसले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश मर्गज तर आभार प्रा. दिलीप गोडकर यांनी मानले. यावेळी राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, अँड. शामराव सावंत, प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, जयप्रकाश सावंत, सुधाकर दळवी आदी उपस्थित होते.