
मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदार महाराष्ट्रातील टॉप 5 मतदार संघात असावा या ध्येयाचा पाठलाग सुरु आहे. गेल्या दहा वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधकांवर टीका करायला काही शिल्लकच नाही. त्यांनी दहा वर्षात काहीच केले नाही. त्यामुळे मागे गेलेला हा मतदार संघ विकासकामातून गतिमानरित्या पुढे आणला जाईल. महायुती सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी प्राप्त केला जाईल. जिल्ह्याचा विकास आराखडाही पहिल्यांदाच चारशे कोटीवर गेला आहे. त्यापैकी 35 टक्के रक्कम जमाही झाली आहे. गावागावातील विकासकामे पूर्ण करताना कोणतेही विकासकाम शिल्लक राहणार नाही असे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
जनतेसाठी काम करायचे आहे. देवाने सगळं काही दिले. राणे हे आडनाव मिळाले आई, वडिलांची पुण्याई आहे. त्यामुळे मतदार संघाला अग्रेसर बनविणे हेच लक्ष राहील. दुसऱ्या बाजूने आपल्या जिवा भावाची संघटना शिवसेना वाढत आहे. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत हे नजर जाईल तिकडे प्रवेश घेत आहेत. त्यामुळे त्यांचा शब्द पडू देणार नाही. त्यांच्या माध्यमातून आलेली सर्व कामे पूर्ण केली जातील. या शिवसेना पक्षातून राणे साहेबांची राजकीय सुरुवात झाली. त्या शिवसेनेतून माझी दुसरी राजकीय इनिंग सुरु झाल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.