पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मनुष्य वस्तीत

Edited by: विनायक गावस
Published on: March 26, 2024 07:30 AM
views 391  views

सावंतवाडी : शहरातील सालईवाडा येथे वनविभाग उपवनसंरक्षक कार्यालय परिसरामध्ये रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एक मोठा गवारेडा दिसून आला. वाढता उकाडा व नरेंद्र डोंगर परिसरात पाण्याची जाणवणारी टंचाई यामुळे तहानलेल्या वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा वस्तीच्या दिशेन वळलेला आहे. वस्तीत वन्यप्राणी आल्यानं सर्वांची तारांबळ उडाली होती. येथील नरेंद्र डोंगर परिसरात गव्यांच्या कळपाच वास्तव्य आहे. जंगलात पाण्याची सोय नसल्यानं वन्यप्राणी पाण्याच्या शोधात पायथा गाठू लागले आहेत. मनुष्यवस्ती त्यांनी कुच केल्यान नागरीकांत मात्र धडकी भरली आहे‌. रविवारी रात्री सालईवाडा परिसरात आलेल्या या गव्याला वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी फटाक्यांचा आवाज करत नरेंद्र डोंगराच्या बाजूला हाकलून लावले. गवा रेडा लोकवस्ती घुसून वर्दळ असलेल्या भागात आल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. दरम्यान, नरेंद्र डोंगरात वास्तव्यास असलेल्या या वन्यप्राण्यांसाठी वनविभागाकडून डोंगरासह पायथ्याला पाण्याची सोय करावी अशी मागणी होत आहे. सामाजिक संघटना, पशुपक्षी मित्र यासाठी नेहमीच वनविभागाला सहकार्य करत असतात.