
सावंतवाडी : नागपूर गोवा या सुमारे ८०५ किलोमीटर लांबीच्या व एकंदर १२ जिल्ह्यातून जाणाऱ्या बहुचर्चित अशा शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत असून या महामार्गामुळे ३ शक्तिपीठे दतगुरूंची धार्मिक स्थळे जोडली जातील संपूर्ण महामार्गाच्या परिसराचा कायापालट होईल या सरकारी गोंडस आमिषाखाली हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जनतेच्या माथी मारला जात आहे. या महामार्गासाठी भू संपादन करण्याचे आदेश शासन स्तरावरुन संबंधित अधिकारी वर्गाला देण्यात आले आहेत व त्यासाठीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जनतेला अंधारात ठेवून महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला खाजगी कंपनीमार्फत रात्रीच्या वेळी निस लावण्याचे काम चालू आहे ते केवळ जनतेचा विरोध टाळण्यासाठीच असा आरोप ॲड. अनिल केसरकर यांनी केला आहे.
मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग सुमारे १८ वर्ष झालीत तरी अर्धवट आहे. सरकारी आश्वासने वारंवार देवून देखील हा महामार्ग पूर्ण होण्याचं नाव घेत नाही. अस असताना जनतेची मागणी नसताना केवळ या महामार्गातून कोट्यावधी रुपयांचा मलिदा लाटता यावा टेंडर मिळावीत या कडे डोळा ठेवून या भागातील सत्ताधारी आमदार, मंत्री मूग गिळून गप्प आहेत. या प्रस्तावित महामार्गामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होणार आहे, ज्या गावांमधून हा प्रस्तावित महामार्ग जाणार आहे त्या गेळे , आंबोली, पारपोली, वेर्ले, उडेली, फणसवडे, घारपी , फुकेरी, तांबोळी, डेगवे, बांदा या भागात मोठ्या प्रमाणात जंगल तोड होऊन निसर्ग संपदा नष्ट होणार आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे जंगली प्राणी मनुष्य वस्तीमध्ये अगोदरच प्रचंड नुकसान करत असताना या महामार्गामुळे यात आणि भर पडणार आहे व याच मुळे या महामार्गाला स्थानिक शेतकरी, पर्यावरणवादी विरोध करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा विरोध धुडकावून लावत जर हा महामार्ग माथी मारला जात असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात संघर्षाची भूमिका घेईल व स्थानिक भूमिपुत्रांच्या बाजून ठामपणे उभी राहील असे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.