हेच का शिंदे-फडणवीसांच हिंदुत्ववादी सरकार ? | 'मविआ'चा सवाल

वारकऱ्यांवरील लाठीहल्ला निषेधार्थ धिक्कार मोर्चा !
Edited by: विनायक गावस
Published on: June 14, 2023 15:12 PM
views 100  views

सावंतवाडी : श्रीक्षेत्र आळंदी येथे दिंडी सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांवर पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याप्रकरणी शिंदे-फडणीस सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी च्यावतीने सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत 'धिक्कार मोर्चा' काढण्यात आला. याप्रसंगी युती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या वारकऱ्यांवर हात उचलण हेच शिंदे-फडणवीसांच हिंदुत्व आहे का ? असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. 

याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच भुषण आहे. मविआच सरकार असताना कोरोनाकाळात देवळ बंद होती. यावेळी आंदोलन करत भाजपनं ती उघडायला लावली. आज त्याच भाजपच्या सरकारमध्ये वारकऱ्यांना हाठीहल्ला केला गेला आहे. त्यामुळे याला जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैतिकता स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना महिला प्रमुख जान्हवी सावंत म्हणाल्या,  ज्ञानेश्वर माऊलींनी बाराशे वर्षांपूर्वी ज्या शेठजी-भटजी, जानव्या शेंडीतून समाजाला मुक्त करून वारकरी भक्तीचा मार्ग दाखवला त्या माऊलीच्या पालखी सोहळ्यास गालबोट लागावं पोलिसांनी वारकऱ्यांना हाठीहल्ला करावा ही निंदनीय बाब आहे. कोरोनात वारकऱ्यांनी पोलिसांत विठ्ठल पाहिला त्या पोलिसांनीच आज वारकऱ्यांवर हात उचलला. मात्र, पोलीस हे हुकुमाचे दावेदार आहेत. जे पोलीस गणेशोत्सवात लाखोंचा समुदाय सांभाळू शकतात ते वारकऱ्यांना निश्चितच सांभाळू शकतात असं मत त्यांनी व्यक्त केले. 


दरम्यान, महाराष्ट्रात अशी गोष्ट कधीच घडली नव्हती. विठ्ठलाचा संपूर्ण महाराष्ट्र भक्त आहे. असं निंदनीय कृत्य आजवर कोणत्याही सरकारनं केल नाही. हे काम या सरकारनं केल. लाखो वारकरी गेली अनेक वर्षे विठूरायाच दर्शन घेतात‌. त्यामुळे वारकऱ्यांवर हात उचलणाऱ्या सरकारनं पाय उतार व्हाव अशी मागणी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी केली. तर इतक्या वर्षात जे पाहिलं नाही ते आज पहाव लागतंय. ब्रिटिश काळात जे घडलं नाही अशी काळीमा फासणारी घटना या सरकारच्या काळात घडली आहे. येणाऱ्या २०२४ ला वारकरीच त्यांना धडा शिकवतील असं मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अँड. दिलीप नार्वेकर यांनी व्यक्त केले. जातीय दंगली घडवून महाराष्ट्र अस्थिर करण्याच काम शिंदे-फडणवीस करत आहेत. वारकरी संप्रदाय हा शिस्तप्रिय संप्रदाय आहे. तुषार भोसले सारख्या भंपक माणसामुळे वारकऱ्यांना प्रवेश न देता लाठीहल्ला केला गेला याचा महाविकास आघाडीकडून निषेध करतो असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीचे महेश परूळेकर, वारकरी संप्रदायातील प्रतिनिधींकडून देखील या घटनेचा निषेध केला गेला. नायब तहसीलदार श्री. मुसळे यांच्याकडे निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला गेला. 

याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अँड. दिलीप नार्वेकर, महिला प्रमुख शिवसेना जान्हवी सावंत, वंचित बहुजन आघाडीचे महेश परूळेकर, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, महेंद्र सांगेलकर, अभय शिरसाट, मायकल डिसोझा, विभावरी सुकी, अँड. सायली दुभाषी, दर्शना बाबर-देसाई, बाळा गावडे, राघवेंद्र नार्वेकर आदींसह सावंतवाडी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वारकरी संप्रदायातील वारकरी उपस्थित होते.