
सावंतावडी : महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईच्या दिशेने खास चतुर्थीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या प्रवासी गाड्यांसाठी एकच चालक पाठवण्यात येत असल्याने बोरवली पर्यंत सुमारे ५५० किलोमिटर अंतरावर विना वाहक सुमारे ४५ पेक्षा जास्त प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आपला पैसा वाचवण्याच्या नादात एस टी कामगारांचे जीव धोक्यात घालून मनमानी पद्धतीने विना वाहक तसेच एकच चालकाची ड्युटी येता-जाता २४ तासांच्या पेक्षा अधिक काळ करवून घेत आहेत. पण ओव्हरटाईम प्रति तास भत्ता मात्र कमी देत आहेत असं मत मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केल आहे.
गणेश चतुर्थीच्या काळात कोकणात परजिल्ह्यातील चाकरमान्यांची मुंबई महामार्गावरून वर्दळ सुरू असताना विना वाहक सुमारे ५५० किलोमिटर अंतरावर चालकाला प्रवाशांचा जीव मुठीत धरून वाहन हाताळावे लागत आहे. परंतु जर एखाद्या वेळेस अपघात घडला किंवा गाडीबिघाड झाला तर जबाबदारी कोणाची ? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांची कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासासाठी योग्य दर आकारणी करून सुद्धा एसटी परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभारमुळे चालक पदावर असलेले कामगार जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. याबाबत संबंधित प्रशासनाने त्वरित योग्य तो निर्णय घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसारच चालक व वाहक यांची ड्युटी नोंदवावी अन्यथा संबंधीत चालकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राज्य मानवाधिकार आयोग संस्थेकडे तक्रार दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबत लेखी पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सिंधुदुर्ग व्यवस्थापकीय कार्यालयात देण्यात येणार असल्याचे मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी सांगितले आहे.