
दोडामार्ग : सध्या दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध खडी क्रशर, चिरे खाणी यांसारखी अवैध उत्खनने सुरु आहेत. तालुक्यातील महसूल विभाग आणि प्रांत कार्यालयामधील अधिकारी मात्र याकडे पूर्णपणे डोळेझाक करत आहेत. महसूल विभाग या अवैध उत्खननांवर कारवाई का करत नाही. अवैध उत्खनन करणार्यांचे व संबंधित अधिकार्यांचे एकमेकांशी चांगलेच धागे दोरे असल्याचे चित्र यारून स्पष्ट दिसून येत आहे, असा गंभीर आरोप मनसेचे उपजिल्हा संघटक तथा कळणे विभाग अध्यक्ष अभय पांडूरंग देसाई यांनी केला आहे.
गेल्या दोन वर्षा पूर्वी तालुक्यातील साटेली- भेडशी येथील गायरान म्हणून समजल्या जाणाऱ्या शासनाच्या जागेमध्ये काही व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन केले होते. त्यावर शासनाकडून कारवाईसुद्धा करण्यात आली होती. मात्र त्या जमिनीचा सर्व्हे व्हावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली होती. दोन वर्षे पूर्ण होऊन देखील अद्यापपर्यंत त्या जमिनीचा सर्व्हे झालेला नाही. तालुक्यात महसूल विभाग असताना शासनच्या जमिनीमध्ये उत्खनन झालेच कसे? उत्खनन होत असताना अधिकारी झोपले होते का? त्यावेळी जे महसूलचे अधिकारी या भागात कार्यरत होते, त्यांची वरीष्ठ पातळीवरून रितसर चौकशी पुढील १५ दिवसात व्हावी, अन्यथा प्रांत कार्यालय सावंतवाडी येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अभय देसाई यांनी दिला आहे.