३५ वर्ष मंत्रीपदे उपभोगून राणेंनी जिल्ह्यासाठी काय केले ..? | विनायक राऊत यांचा सवाल

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 28, 2024 05:13 AM
views 208  views

कणकवली : ३५ वर्षे राज्यातील आणि केंद्रातील अनेक मंत्रिपदे उपभोगून नारायण राणे यांनी या जिल्ह्यासाठी काय केले..? असा सवाल महायुती चे उमेदवार विनायक राऊत यांनी केला. जिल्ह्यासाठी मंजुर असलेली कॅथ लॅब केवळ आपल्या हॉस्पिटल ची कार्डियक कॅथ लॅब चालावी म्हणून शासकीय कार्डियक कॅथ लॅब सोलापूर ला पाठवली असा आरोप राऊत यांनी केला. लोकसभा निवडणुकीची कळसुली विभागाची प्रचार सभा वागदे येथील हॉटेल भालचंद्र च्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राऊत बोलत होते.

आम्हाला राजकीय दहशतवाद नकोय, पोलिसांनी अश्या अप प्रवृत्तीचा वेळीच बंदोबस्त करावा. या जिल्ह्याला शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा पुन्हा राजकीय दहशत फोफावण्याचा धोका नाकारता येत नाही. असेही यावेळी त्यांनी सांगितले. पुढे बोलताना केंद्र शासनाच्या अनियमित धोरणांमुळे देशात महागाई वाढली असून ती आटोक्यात आणण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले असून त्यावर बोलण्यास कुणीच तयार नाही असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलमताई पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सौ. वंजारी मॅडम, इर्शाद शेख, राजू राठोड, सचिन सावंत आदी इंडिया आघाडीचे मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.