ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे काय आहेत फायदे ?

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 09, 2025 20:07 PM
views 104  views

सिंधुदुर्गनगरी : केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे निश्चित केले आहे. या लाभाचा लाभ घेण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या नोंदणीनंतर संबंधित कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अजिंक्य बवले यांनी दिली.

 गेल्या काही वर्षांत प्लॅटफॉर्म इकॉनॉमी भारतात आणि जागतिक स्तरावर रोजगार निर्मितीचे एक मोठे साधन बनले आहे.  लाखो गिग कामगार प्लॅटफॉर्म इकॉनॉमी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना सुरक्षित भविष्यासाठी सरकारी योजनांचा लाभ मिळावा, म्हणून केंद्र शासनाने गिग कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गिंग कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येईल. यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉय, राइडर, ड्रायव्हर आणि इतर गिग कामगारांना दिलासा मिळेल. 


नोंदणीचे फायदे

मोफत अपघात विमा संरक्षण, सामाजिक सुरक्षा योजना लाभ, सरकारी योजनांशी थेट जोडणी. भविष्यातील कल्याणकारी योजनांमध्ये समावेश. 

कोण करू शकतात नोंदणी ?

झोमॅटो, स्विगी, ओला, उबेर, फ्लिपकार्ट, ब्लिंकिट व झेप्टो यांसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे काम करणारे डिलिव्हरी बॉय, रायडर, ड्रायव्हर, अशा गिग कामगारांना विविध योजनांचा लाभमिळविण्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र 

आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेले मोबाइल नंबर, बँक खाते तपशील.

नोंदणीसाठी पात्रता :

वय १६-५९ असावे. आयकर भरणारा नसावा. ईपीएफओ व ईएसआयसीचा सदस्य नसावा.

"गिग, प्लॅटफॉर्म कामगारांना महा ई-सेवा केंद्र किंवा http://register.eshram.gov.in/use rp rier या लिंकवर ऑनलाइन नोंदणी करता येते. संबंधित कामगारांनी त्यांच्या हक्काचे संरक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी."

-अजिंक्य बवले, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग