शाब्बास..! सिंधुपुत्र वैभवकुमार..राष्ट्रीय पातळीवर वाजवला लाल मातीचा डंका..!

भारतीय जादू संमेलनामध्ये जादू विशारद, जादू भूषण पुरस्काराने झाला सन्मान
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: April 19, 2023 15:42 PM
views 104  views

सावंतवाडी : सिंधुदुर्गाचे सुपुत्र जन्मस्थान बांदा व सध्या ओटवणे येथे वास्तव्याला असलेले सुप्रसिद्ध जादूगार वैभव कुमार यांना नुकताच पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेच्या सातव्या भारतीय जादू संमेलनामध्ये जादू विशारद व जादू भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्र गोवा कर्नाटकात बेळगाव कारवार येथे अनेक ठिकाणी जादूचे प्रयोग करून आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळे सिंधुदुर्गाचे नाव उज्वल केले आहे .

शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन टू स्टार हॉटेल ते गोव्यातील ताजसारख्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांनी अल्पकाळासाठी नोकरी केली परंतु त्यांचे नोकरीत मन रमेना. त्यांना एकच ध्येय होता की आपणाला कलेच्या माध्यमातून देश विदेशातील लोकांनी ओळखले पाहिजे. यासाठी कोणत्यातरी विशेष कलेत आपल्याला प्राविण्य मिळविले पाहिजे. त्याना लहान असताना त्यांच्या वडिलांनी अनेक जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर, सुहानी, आनंद, पी सी सरकार, भैरव यांचे जादूचे प्रयोग दाखविले. त्यामुळे त्यांनी लहान असतानाच आपणाला ही यांचेसारखे महान जादूगार व्हायचे आहे अशी महत्त्वाकांक्षा त्यांनी त्यांचे वडील रामदास पारकर यांच्याकडे व्यक्त केली. त्यांच्या वडिलांचा सिंधू कलाकार मंच असून त्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडविले. त्यातील अनेक कलाकार व्यावसायिक कलाकार बनून  आपला  चरितार्थ चालवीत आहेत. 


जादूगार वैभव कुमार यांना महान जादूगार बनण्यासाठी भारतात जिथे जिथे जादूचे प्रशिक्षण देणारी संमेलने होत त्या ठिकाणी म्हणजे सुरत बंगलोर हैद्राबाद सिकंदराबाद मुंबई पुणे गोवा येथे देश विदेशातील जादू तज्ञांकडून जादूचे वर्कशॉप असतील तिथे जाऊन नवनवीन जादूची विद्या संपादन केली. आता त्याना परदेशात जाऊन पुढील  शिक्षण घ्यावयाचे असून परदेशात देखील जादूचे कार्यक्रम करून सिंधुदुर्गाचे नाव उज्वल करावयाचे आहे.

जादूगार वैभव कुमार यांना घडवण्यासाठी जादूचे  जागतिक प्रशिक्षक माननीय सतीश देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच  जादूगार कस्तुरे आणि विनय राज, अवधुत तसेच ऑल इंडिया मॅजिशियन ग्रुपचे पण त्यांना सहकार्य लाभले

आजवरच्या त्यांच्या यशस्वी कारकीर्दीत त्यांनी अंध अपंग तसेच वृद्धाश्रम व ज्येष्ठ नागरिक यांच्या संस्थेसाठी विनामूल्य कार्यक्रम करून सामाजिक योगदान दिले. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी जादूतून अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञानातून जादू, भोंदू बाबांचे चमत्कार या विषयातून जादू दाखवून समाज जागृतीचे कार्य केले. पाच वर्षाच्या मुलापासून ते नव्वदीतल्या ज्येष्ठांना आवडणारे ते मनमिळाऊ जादूगार म्हणून प्रसिद्ध आहे.  आज अनेक संस्थांनी त्यांना मानपत्र मानचिन्ह देऊन सन्मानित केले महाराष्ट्र अपंग मित्र फेलोषिप संस्था, ग्लोबल मालवणी संस्था मुंबई,  विद्यार्थी विकास प्रशिक्षण अकॅडमीतर्फे राष्ट्रीय युवा जादुगार पुरस्कार  इंटरनॅशनल ह्यूमन राईट जस्टिस फेडरेशन संस्थेतर्फे महाराष्ट्र लोक गौरव पुरस्कार  असे अनेक पुरस्कार आजवर मिळाले तसेच जिव्हाळा सेवाश्रम ट्रस्ट, भीमगर्जना बौद्ध मंडळ अशा महाराष्ट्र गोवा कर्नाटकातील अनेक संस्थांनी त्यांना आजवर सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानी केले

 भावी काळात मुलांना मोबाईल गेमच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांच्यासाठी अनेक ठीकाणी जादूची कार्यशाळा घेऊन त्यांना उत्कृष्ट निवेदक व जादूगार घडविण्याचा त्यांचा मानस आहे अशा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सिंधुदुर्गाच्या आगळ्यावेगळ्या जादूगाराला कोकणसादकडून भावी  कारकीर्दीसाठी शुभेच्छा..!