
सावंतवाडी : दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत पेंडूर गावातील ऐतिहासिक वेताळगडावरील मध्यावर असणाऱ्या विहीरवजा पाण्याच्या टाकीची रविवार २३ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. स्वच्छता करण्यात येणार आहे. दुर्गप्रेमींनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ९८६०२५२८२५ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन दुर्ग मावळा परिवारातर्फे करण्यात आले आहे.
गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा, मध्यम चढाईचा, समुद्रसपाटीपासून ४४० फूट उंचीवर असलेला वेताळगड पेंडूर गावात सुमारे २२ एकर परिसरात वसलेला आहे. सावंतवाडीच्या खेम सावंतांनी करवीरकरांच्या रांगणा व सिंधुदुर्ग यांच्या मार्गावर बरोबर मध्ये नेमके स्थळ फिरून तेथे १७७६ साली किल्ला बांधून त्यास वेताळगड नाव दिले. या वेताळामुळे सावंतांनी गडास वेताळगड नाव दिले. एका उंच टेकडीवर घाईगडबडीत बांधलेला वेताळगड म्हणावा तेवढा मजबूत झाला नव्हता. गडाचे बुरुज दरवाजे इतिहासजमा झाले आहेत. पाण्याच्या टाक्यांचे व तलावांचे अवशेष आहेत. गडावरील पूर्वी पाण्यांचा साठा असलेल्या विहिरी-टाक्या पूर्णतः बुजल्या आहेत. माथ्यावरून पूर्वेला सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील गगनगड, भैरवगड दिसतात.
दक्षिणेस कर्ली नदीचे खोरे व प्रसिद्ध ऐतिहासिक धामापूर तलाव दिसतो. लष्करी मोहिमांत रसद पुरविणे, युद्धसामग्रीची निर्मिती करणे, दारूगोळा साठविणे मुलुखाची वसुली जमा करणे यासारखेच कामकाज त्याकाळी वेताळगडावर चालत असावे, असे वाटते.