
सावंतवाडी : आरोंदा हुसेनबाग येथे राहणाऱ्या मच्छीमार बांधवांना जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून घर उद्धवस्त करण्याचा प्रकार समोर आला असून या संदर्भात तेथील मच्छिमार बांधवांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या खरेदी-विक्री व्यवहाराला आमची सामूहिक हरकत असून ती नोंदवून घ्यावी व आमची बाजू मांडण्याची आम्हाला संधी द्यावी अशी मागणी केली. मच्छीमार बांधवांच्या या लढाईमध्ये ठाकरे शिवसेना ठामपणे उभी आहे. त्यांना बेघर करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा इशाराही श्री राऊळ यांनी दिला.
आरोंदा हुसेन बाग येथे मच्छिमार बांधव राहत असलेल्या जमिनीची विक्री झाली आहे. त्या जमिनीमध्ये कुळ म्हणून असलेल्या व्यक्तीकडून मालकी दाखवत या संदर्भातचा व्यवहार एका लाभ नामक कंपनीशी केला आहे. येथील मच्छिमार बांधव हे या जमिनीमध्ये संस्थान काळापासून जवळपास 400 वर्ष वास्तव्यास आहेत. संस्थांनकडून त्यांना ही जमीन देण्यात आली आहे. या जमिनीमध्ये जवळपास मच्छिमार बांधवांची 15 घरे आहेत. ज्या जागेत घरे आहेत त्या जागेचा सातबारा मच्छीमार बांधवांच्या नावे असल्याचे मच्छीमार बांधवांचे म्हणणे आहे. मात्र, इतर जमिनीमध्ये कुळ म्हणून असलेल्या व्यक्तीकडून त्या ठिकाणी सातबारावर आपली मालकी दाखवून या जमिनीची विक्री केली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीकडून या मच्छीमार बांधवांना बेघर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही तुम्हाला दुसरीकडे स्थलांतरित करणार आहोत. आपली घरेही अनधिकृत आहेत असेही त्या कंपनीच्या वकिलांकडून सांगण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकूणच झालेल्या प्रकारामुळे मच्छीमार बांधव हादरून गेले असून त्यांनी या संदर्भात तलाठी आरोंदा यांच्याकडे हरकत घेण्यास धाव घेतली असता त्यांची हरकत स्वीकारणार नाही. फेरफारची कारवाई पूर्ण केली जाईल असे उत्तर तलाठ्याकडून देण्यात आले. त्यामुळे संबंधित मच्छीमार बांधवांनी ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली.
यावेळी उपस्थित मच्छीमार बांधवांकडून गैरफायदा घेऊन जमिनीची विक्री करण्यात आली असून आमच्या मूलभूत हक्कावर गदा आणण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन खरेदी विक्री प्रकरणावर आम्हाला आमच्या हरकती नोंदवण्याची संधी देण्यात यावी तसेच या व्यवहारासंबंधी फेरफार च्या सुनावणीच्या नोटीसा आम्हाला बजावण्यात यावा. त्या संदर्भातील संबंधित ते आदेश पारित करण्यात यावेत. शिवाय, संबंधित लाभ नामक कंपनीला आपल्याकडून कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली. यानंतर तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आरोंदा तलाठी यांच्याशी फोनवरून चर्चा करत संबंधित मच्छीमार बांधवांच्या हरकती करण्याच्या सूचना केल्या. यावेळी मच्छिमार बांधव संघटनेचे अध्यक्ष गोकुळदास मोठे,शिवराम कोरगावकर, संतोष कोरगावकर, रामदास पेडणेकर, प्रथमेश नवघरे, तुकाराम कोरगावकर, हरिश्चंद्र कोरगावकर, रघुवीर पेडणेकर, अनंत चांदेकर, भरत कोरगावकर आदी मच्छीमार बांधव उपस्थित होते.