
सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा तर्फे साटेलीमध्ये खोटी कागदपत्रे रंगवून अवैध मायनिंग उत्खननातून सुरू आहे. या सगळ्या प्रकारामाचा आका कोण ? असा सवाल उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपस्थित करून लवकरच त्यासंदर्भात आवाज उठवितांना तेथील जनतेला विश्वासात घेऊन गणेश चतुर्थीच्यानंतर मोठे जनआंदोलन उभारले जाईल अशी माहिती दिली. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुळे यांनी जिल्हा दौऱ्यामध्ये वाळू माफियांसह अवैध उत्खनन तसेच चुकीच्या कामांची चौकशी करून कारवाईची भूमिका मांडली. ही भूमिका सत्यात उतरल्यास जिल्हावासियांच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करू असेही पारकर म्हणाले.
श्री पारकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळे होत आहेत. तर दुसरीकडे अवैध मायनिंग सारखे उत्खननही सुरू असून कोट्यावधीचा महसूल बुडवला जात आहे. आपण या संदर्भात अनेक पत्रव्यवहार येथील महसूल प्रशासनाकडे तर प्रत्यक्ष महसूल मंत्र्यांकडेही केले. सासोली सारखा जमीन घोटाळ्याबाबत अनेक आंदोलने केली. मात्र असे असताना सुद्धा हे प्रकार कुठे थांबताना दिसत नाहीत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये असे प्रकार उघडकीस येत आहेत. सद्यस्थितीत सातार्डा तर्फे साटेली तसेच खोटी कागदपत्रे बनवून मोठ्या प्रमाणात अवैध मायनिंग उत्खनन सुरू आहे. परदेशाता हा साठा पाठवला आहे. याकडे महसूल प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष आहे. मात्र, या अवैध उत्खननाची तसेच त्याच्या वाहतुकीची चौकशी करण्याची जबाबदारी महसूलची असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या सर्व प्रकारामागे नेमका कोणाचा हात आहे ? या मागचा नेमका आका कोण ? हे शोधणे गरजेचे असून लवकरच याबाबत आवाज उठवताना तेथील स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन मोठे जनआंदोलन गणेश चतुर्थी नंतर उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला.
तसेच जिल्ह्यात जमीन घोटाळे अवैध उत्खनन आदी सारखे प्रकार घडत असताना त्यामध्ये अधिकाऱ्यांनी बळी न पडता आपली जबाबदारी ओळखून व आपले कर्तव्य पार पडत असताना ते कायद्याने पार पाडणे गरजेचे आहे. मात्र, या ठिकाणी तसे होताना दिसत नाही. महसूल मंत्री बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी या ठिकाणच्या वाळूमाफिया तसेच विविध प्रश्न संदर्भात वक्तव्य केली. या ठिकाणी अवैध उत्खननाची चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. परंतु ते यासंदर्भात आपल्याकडे कुठली तक्रारच नाही म्हणत असतील तर सासोली जमीन घोटाळा प्रकरणाच्या अनेक तक्रारी आपण प्रशासनासह शासन स्तरावर केल्या आहेत. त्यामुळे त्यांनी ज्याप्रमाणे काल भूमिका मांडली ती भूमिका प्रत्यक्षात उतरल्यास आपण त्यांचा जिल्हा वासियांच्यावतीने जाहीर सत्कार करू, तसेच जिल्ह्यातील अवैध उत्खनन जमीन घोटाळे आधी प्रकरणांमध्ये महसूल प्रशासन नेमके का बळी पडतो ? हाच मुद्दा आहे. त्यामुळे शासनाने गेल्या पंधरा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या ज्या जमिनीची खरेदी-विक्री झाली, कुठल्या जमिनी कुठल्या कंपनीला विकल्या, किती परप्रांतीयांच्या ताब्यात गेल्या तर किती जमिनी शिल्लक राहिला याची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी ही श्री पारकर यांनी केली.