
कणकवली : जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकांमध्ये शिंदे शिवसेना ही विरोधकांना सोबत घेऊन लढणार असेल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आम्ही शिंदे शिवसेनेची संबंध तोडू, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी दिला. यावेळी राणे यांनी उबाठा शिवसेनेतून नुकतेच शिंदे शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार राजन तेली यांच्यावरही सडकून टीका केली.
प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत राजन तेलींवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, राजन तेली हे शिंदे शिवसेनेत सध्या टेम्पररी आहेत त्यांना परमनंट करायचे की नाही याबाबत मी लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. तर कणकवलीतील काही प्रतिष्ठित नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी करणार असल्याच्या राजन तेली यांच्या विधानविषयी बोलताना नारायण म्हणाले, राजन तेली प्रतिष्ठित नागरिकांमध्ये येतात का? ज्यांना टाकून दिले आहे, अशांना एकनाथ शिंदे का जवळ करतात? कणकवली शहरात खरेच अशी वेगळी युती होईल का, असा सवालही नारायण राणे यांनी केला.










