
सावंतवाडी : माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश करताना एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये जाणे चूक होती असे म्हटले आहे. या त्यांच्या वाक्याला आमचा आक्षेप असून उद्या त्यांना सावंतवाडीची उमेदवारी मिळाल्यास त्यांचा प्रचार करून चूक करावी का ? याबाबतचा निर्णय आता काँग्रेस पक्षश्रेष्ठीच घेतील असा गर्भित इशारा वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विधाता सावंत यांनी दिला. तसेच महाविकास आघाडी म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जागाही काँग्रेसला सुटणार आहे तसा शब्द आम्हाला वरिष्ठांनी दिला आहे असा दावा सावंतवाडी कॉग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी केला.
सांगेलकर म्हणाले, उमेदवार म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे यांना संधी देण्यात यावी अशी एकमुखी मागणी ही आम्ही केली आहे. मात्र ऐनवेळी अन्य पक्षातील उमेदवाराला संधी मिळाल्यास महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळणार असल्याचे सावंतवाडी उपाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी सांगितले.
सावंतवाडी येथे तिन्ही तालुक्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री सांगेलकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विधाता सावंत,रवींद्र म्हापसेकर, राघवेंद्र नार्वेकर,प्रकाश डीचोलकर, सिद्धेश परब,रुपेश आहिर,सुमेधा सावंत, माया चिटणीस, श्याम सावंत, संजय लाड, बाबू गवस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी काँग्रेस पक्षावर प्रामाणिक काम करणारे कार्यकर्ते असून मतदारही आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सुटावा अशी एकमुखी मागणी आम्ही पक्षाच्या झालेल्या बैठकीनंतर पंधरा दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रभारी चैनी खलाला यांच्याकडे केली होती. शिवाय उमेदवार म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे यांच्या नावाची एकमुखी मागणी केली होती एकूणच यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठांकडून आम्हाला आश्वासित करण्यात आले होते तसेच ही जागा काँग्रेसला सुटणार असेही सांगण्यात आले होते एकूणच या मतदारसंघाची उमेदवारी अद्यापही जाहीर झाली नाही त्या अनुषंगाने ही जागा काँग्रेसला सुटणार आहे. काही जण उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण करत असतील तर ते चुकीचे आहे असा प्रयत्न कोणीही करू नये असा इशाराही त्यांनी स्वकियांना दिला.
विधाता सावंत म्हणाले, काँग्रेस पक्ष हा संघटनेवर चालतो या ठिकाणी संघटनेचे आदेश म्हणून कार्यकर्ता काम करत असतो गावडे हे संघटनात्मक कार्य करत आहेत ते प्रकाश होतात नसले तरी प्रत्येक कार्यकर्त्यांच्या संपर्कात ते अनेक वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षाचे काम करताना या ठिकाणी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केलेली आहे सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे म्हणूनच त्यांच्या नावाची आम्ही एकमुखाने वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे.