'घुंगुरकाठी' कडून 'आम्ही साहित्यप्रेमी' व्यासपीठाची स्थापना

Edited by:
Published on: February 17, 2025 12:51 PM
views 142  views

सिंधुदुर्ग : साहित्यरसिकांना एकत्र आणून ओरोस परिसरात साहित्यिक चळवळ सुरु करण्याच्या आणि लोकांना पुस्तकांकडे वळविण्याच्या उद्देशाने 'घुंगुरकाठी' संस्थेने पुढाकार घेऊन 'आम्ही साहित्यप्रेमी' या व्यासपीठाची स्थापना केली आहे. या व्यासपीठाचा पहिला कार्यक्रम २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता रा. ब. अनंत  शिवाजी देसाई वाचनालयात होणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक प्रा. प्रवीण बांदेकर आणि ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.

या व्यासपीठाची पहिली बैठक 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत व उपाध्यक्ष डॉ. सई लळीत यांनी नुकतीच ओरोस येथे आयोजित केली होती. देसाई वाचनालयात झालेल्या या बैठकीला वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश जैतापकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, सर्वश्री उदयकुमार जांभवडेकर, रामचंद्र घोगळे, सुरेश पवार, श्रीराम चव्हाण, सतीश चव्हाण, सुधीर गोठणकर, शंकर कोकितकर, डॉ. अनिल ठोसरे, श्रीमती सुप्रिया वालावलकर, ग्रंथपाल नेहा कशाळीकर, नम्रता रासम, आर्या बागवे, सुस्मिता राणे, वैष्णवी परब उपस्थित होते. या सर्वांनी चर्चेत सहभाग घेत उपक्रमाचे स्वागत करुन सहकार्याचे आश्वासन दिले.  

यावेळी  लळीत यांनी हे व्यासपीठ सुरु करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ओरोस, येथे साहित्यिक कार्यक्रम फारच अपवादाने होतात. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या साहित्यप्रेमी, वाचनप्रेमी, काव्यप्रेमी रसिकांची याबाबत उपासमार होते. ओरोसची ही उणीव भरुन काढण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून या व्यासपीठाची स्थापना करण्यात येत आहे. सध्या आपापसात वाढलेला द्वेष, मोबाईल आणि सोशल मिडियाचा अतिरेकी वापर, स्वस्त मनोरंजन यामुळे सामाजिक मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत आहे. नवी पिढी याच्या पूर्ण आहारी गेली आहे. वाचनसंस्कृती वाढविणे, साहित्यविषयक छोटे छोटे उपक्रम राबवून एकत्र येणे, हा यावरचा उपाय आहे. यासाठी 'घुंगुरकाठी' स्वयंसेवी संस्थेतर्फे असे कार्यक्रम करण्यासाठी 'आम्ही साहित्यप्रेमी' हे अनौपचारिक व्यासपीठ सुरु करीत आहोत, असे श्री. लळीत म्हणाले.या व्यासपीठाच्या माध्यमातून व्याख्याने, छोटे साहित्य मेळावे, कविसंमेलने, छोट्यांसाठी वाचनाचे कार्यक्रम, कथाकथन, नाट्यप्रवेश वाचन, वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा, लेखक, कवींच्या मुलाखती याबरोबरच संगीताचे कार्यक्रम, लोककलाकारांचे सादरीकरण असे कार्यक्रम करण्याचा विचार आहे. व्यासपीठातर्फे महिन्याला किमान एक कार्यक्रम आयोजित केला जाईल, अशी माहिती डॉ. सई लळीत यांनी दिली.

या व्यासपीठाचा पहिला कार्यक्रम कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच मराठी भाषा गौरवदिनी २७ फेब्रुवारीला अनंत शिवाजी देसाई वाचनालयाच्या सहकार्याने घेण्याचे निश्चित झाले. रवळनाथ मंदिराच्या मागे असलेल्या देसाई वाचनालयात हा कार्यक्रम दुपारी ३.३० वाजता होईल. यावेळी लेखक प्रा. प्रवीण बांदेकर 'वाचनसंस्कृतीवरील आक्रमणे' या विषयावर बोलतील. नंतर कवी दादा मडकईकर सुश्राव्य मालवणी कविता सादर करतील. हा कार्यक्रम सर्व साहित्यरसिकांना खुला आहे. डॉ. सई लळीत यांनी आभार मानले.