वावळेश्वर मंदिर ते परमे, घोटगे रस्त्याची चाळण

Edited by: संदीप देसाई
Published on: April 27, 2024 10:00 AM
views 76  views

दोडामार्ग : तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या साटेली- भेडशीतील वावळेश्वर मंदिर ते परमे, घोटगे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याचे दि-१४ मार्च २०२४ रोजी भूमीपूजन देखील झाले होते. त्यामुळे हे भूमीपूजन फक्त श्रेयवादासाठी होते का? असा सवाल साटेली- भेडशी, परमे, घोटगे या गावातील नागरिकां कडून विचारला जात आहे.

भूमिपूजन होऊन देखील जर रस्ता होत नसेल,तर नक्की याला जबाबदार तरी कोण,राजकीय मंडळी, संबंधित अधिकारी की ठेकेदार असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. व्यवस्थित सुस्थितीत रस्ता प्रवासासाठी नागरिकांना मिळावा ही देखील एक नागरिकांची गरज बनली आहे. मात्र हा रस्ता होत नसेल तर असे प्रतिनिधी तरी काय कामाचे त्यामुळे साटेली-भेडशी,परमे,घोटगे येथील बहुतांश लोक लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेत आहेत.

स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत असताना रस्ता व्हावा या गरजेसाठी तसेच प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलने उपोषणे करावी लागतात या सारखे दुसरे दुर्दैव नाही.प्रशासन या रस्त्यांची देखभाल करण्यासाठी अशाच आंदोलनाची कींवा उपोषणाची तर वाट बघत नाही ना असा प्रश्न पडतो. तसेच राजकीय मंडळी देखील या रस्त्याने प्रवास करतात मात्र ते देखील या रस्त्याबाबत आवाज उठवताना दिसत नाहीत. तसेच या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमधून देखील प्रशासनावर राजकीय मंडळींच्या कामकाजा बाबत तिव्र नारजीच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.