
सावंतवाडी : चराठा गावडे शेत येथील विजयश्री बाबाजी निवेलकर यांनी घरासाठी ग्रामपंचायतीकडे नळनेक्शन मागितलं होत. मात्र, ग्रामपंचायतीला शक्य नसल्यानं ना हरकत दाखला देत नगरपरिषदेकडून नळ कनेक्शन घेण्यास सांगितले गेले. निवेलकर यांच्या जागेतून न.प.ची पाईप लाईन गेली असून शेजारील घरांना पाणीपुरवठा होतो.मात्र, या कुटुंबाला न.प.ने कनेक्शन नाकारलं आहे. त्यामुळे पाईपलाईन उशाला अन् कोरड घशाला अशी परिस्थिती या माय- लेकी विजयश्री व धनश्री यांच्यावर आली आहे.
घराच्या नळ कनेक्शनसाठी ग्रामपंचायतीत गेलो मात्र त्यांनी नाहरकत दाखला देत नगरपरिषदेत जाण्याचा सल्ला दिला. तिथे जाऊन अर्ज केला असता न.प.कडून नळ कनेक्शन देऊ शकत नाही असं सांगितलं गेलं. आमच्या जागेतून नळ कनेक्शन गेलं असताना आम्हाला पाणी मिळत नाही आहे. त्यामुळे पुढे काय करायचं ? हा प्रश्न पडला आहे. विहीरींचही पाणी आटत आहे त्यामुळे तहान कशी भागवायची असा प्रश्न आम्हासमोर आहे. न.प. ग्रामपंचायतीकडे अन् ग्रामपंचायत न.प.कडे जाण्यास सांगत असून आम्ही पाण्यावाचून वंचित आहोत अशी कैफियत विजयश्री निवेलकर यांनी मांडली.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अमित वेंगुर्लेकर म्हणाले, पाण्याची पाईपलाईन यांच्या जागेतून गेली आहे. १९८२ सालात जागा खरेदी केलेली आहे. घर बांधणीसाठी परवानगी देताना लाईट आणि पाणी या गोष्टींचा विचार केला जातो. मात्र, यांच्या जागेतून नळ कनेक्शन गेलेल असताना पाण्यासाठी या महिलेला हजारदा हेलपाटे मारावे लागत आहे. मानवाधिकार संघटनेकडे या कुटुंबान अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत लक्ष वेधलं होत. मात्र, त्यांनी नाहरकत दाखला देत न.प.कडून पाणी पुरवठा होणार असल्याने तेथून घेण्यास सांगितले. या कुटुंबाला पाण्याची गरज आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी श्री. वेंगुर्लेकर यांनी केली आहे.