सर्वोदय नगरमध्ये पाणी टंचाई ; नागरिकांनी वेधलं सीओंचं लक्ष

Edited by: विनायक गांवस
Published on: April 12, 2025 17:41 PM
views 118  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सर्वोदय नगरवासीयांची पाण्यासाठी चांगलीच दमछाक होत आहे. नळाला पाणी येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही उपयोग होत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. एप्रिल महिना अर्धा संपला असून, पावसाळा सुरू व्हायला अजून बराच अवकाश आहे. त्यामुळे भविष्यातील अडचणी लक्षात घेता पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.     

सर्वोदय नगर रहिवासी संघाचे मुख्य प्रवर्तक सुनील राऊळ आणि मेघना राऊळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालिका प्रशासनाच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात सुनील राऊळ यांच्यासर मेघना राऊळ, दिशा कामत, शरयू बार्देस्कर, शुभांगी नार्वेकर, अनुश्री राणे, विद्याधर तावडे, प्रकाश परब, वासुदेव शिरोडकर, गुंडु साटेलकर, संजय नार्वेकर, गुरुदास कामत, एस. एस. नाईक, रोहन नार्वेकर, श्री. कोरगावकर, अमन बार्देस्कर, कुलकर्णी, बोर्डेकर, ओंकार राणे, छाया पालव, रोशनी गावडे, सुनंदा गवस, स्मिता कुलकर्णी, रतन भोसले, मेघा बोर्डेकर आदींचा समावेश होता. 

तर भारतीय जनता पक्षाचे शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानेही पालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात अजय गोंदावळे, मेघना राऊळ, शरयू बार्देस्कर, श्रीमती नार्वेकर, अनुश्री राणे, गुरुदत्त कामत आदींचा समावेश होता.

    लवकरच हा प्रश्न सुटेल, असा आशावाद सुनील राऊळ यांनी व्यक्त केला आहे. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवासी संघाने दिला आहे.