कळसुलीतील त्या क्रशरचा पाणी व विद्युत पुरवठा होणार बंद

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय कोल्हापूर यांच्या आदेश
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 30, 2023 19:48 PM
views 416  views

कणकवली : कणकवली तालुक्यामधील ग्रामपंचायत कळसुली व शिवडाव येथील सुरू असलेल्या क्रशरमुळे गावांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून सदर क्रशरमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांकडून व सरपंच  सचिन पारधिये यानी शासनाकडे गेले वर्षभर केल्या होत्या व सदर क्रशर बंद करण्यात यावेत अशी जोरदार मागणी केली होती. याबाबत प्रसंगी रास्ता रोको आंदोलन सुद्धा करण्यात आले होते..

स्थानिक आमदार नितेश राणे यानीही विधानसभेमध्ये आवाज उठवून शासन दरबारी सदर बेकायदा सुरू असलेले क्रशर बंद करण्याची मागणी लावून धरली होती. या सर्व प्रयत्नांना यश आले असून मौजे शिवडाव येथील मे. एस. व्ही. स्टोन क्रशर व कळसुली उल्हासनगर येथील मे. व्हिक्टर एन्टर प्रायझेस या दोन क्रशरवर कारवाईच्या बडगा उगरला असून, या दोन क्रशरचा विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय कोल्हापूर यानी दिनांक २२ मे २०२३ रोजी जारी केले असून तशा सूचना महावितरण कणकवली तसेच ग्रामपंचायत कळसुली व ग्रामपंचायत शिवडाव यांना दिले आहेत.अशा प्रकारची कारवाई शासनाकडून झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी आभार मानले आहे.

तसेच इतरही क्रशर गावामध्ये असल्याने त्यांच्या विरोधात देखील आता अशाच पद्धतीची आक्रमक भूमिका घेत कळसुली गाव क्रेशर मुक्त कळसुली करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.