कोकण रेल्वेत अडकून पडलेल्या प्रवाशांना मंत्री केसरकरांच्या माध्यमातून पाणी आणि नाष्ट्याची सोय...!

Edited by: विनायक गावस
Published on: October 03, 2023 15:22 PM
views 212  views

सावंतवाडी : मध्य रेल्वेच्या मार्गावर शनिवारी पनवेलनजीक मालगाडीचे डबे घसरल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन मुंबईला जाणाऱ्या आणि कोकण रेल्वे मध्ये अडकून पडलेल्या सिंधुदुर्गातील प्रवाशांना शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पनवेल आणि पेण रेल्वे स्थानकात पाणी आणि नाष्ट्याची सोय करण्यात आली. मंत्री केसरकर यांनी केलेल्या या सोयीबद्दल प्रवाशांनी आभार व्यक्त केले.

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने तब्बल 30 तासाहून अधिक काळ शनिवारी कोकण रेल्वेतून परतीच्या प्रवासाला निघालेले चाकरमानी पनवेलमध्ये अडकून पडले होते. त्यावेळी रेल्वेमध्ये खाण्यापिण्याची कुठली सोय नसल्याने तसेच पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले होते. कोकण रेल्वे कडूनही प्रवाशांच्या सेवेबद्दल कुठली व्यवस्था न केल्याने अक्षरशः प्रवाशांकडून तीव्र नाराची व्यक्त होत होती. एकूणच या वस्तुस्थिती बाबत मळेवाड येथील शिंदे सेनेचे कार्यकर्ते जनार्दन नाईक यांचे चिरंजीव अभिजीत नाईक यांनी वडिलांना सांगितल्यानंतर श्री नाईक यांनी मंत्री केसरकर यांना याबाबतची माहिती दिली.

सिंधुदुर्गातील प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता मंत्री केसरकर यांनी महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून तात्काळ प्रवाशांच्या खाण्यापण्याची व्यवस्था केली. आमदार भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्याने पाण्याच्या बॉटल सह नाष्टा पनवेल आणि पेण या स्थानकावर अडकून पडलेला रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करून दिला. मंत्री दीपक केसरकर यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.