
दोडामार्ग : कोलझर कोळमवाडी येथे ब्राह्मण जेवणाच्या कार्यक्रमात गांधीलमाशांच्या हल्यात ६ जण जखमी झाल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. यात ओगले, मुरारी मुंगी जितेंद्र देसाई, अक्षय सावंत, सिद्धू सावंत, शरद देसाई हे जखमी झाले असून स्थानिकांनी त्यांना तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. यावेळी डॉक्टर राणे यांनी प्राथमिक उपचार करून घरी सोडले.
याबाबत अधिक माहिती अशी की कोलझर कोळमवाडी येथील काही ग्रामस्थ एका देवाच्या झाडापाशी ब्राह्मण भोजन करतात. दरवर्षीप्रमाणे त्यांनी गुरुवारी ब्राह्मण भोजन करायचे ठरवले. विधिवत पूजा करून झाल्यानंतर देवाची आरती सुरू असताना, अचानक गांजिल माशांनी तेथे असलेल्या सर्वांवर हल्ला केला. आपला जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण सैरभैर पळू लागले. त्यात ब्राह्मण ओगले अधिक जखमी झाले. ही घटना वाडीतील ग्रामस्थांना समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. राणे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडले. सहाही जणांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.