आनंदाचा शिधा हिंदूंची मतांसाठी वाटला होता का?

शिधा बंद करण्याचे कारण मुख्यमंत्र्यांनी द्यावे
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 04, 2025 17:28 PM
views 74  views

कणकवली : आनंदाचा शिधा हिंदुंची मते मिळविण्यासाठी वाटला होता का, असा खडा सवाल शिवसेना उबाठा पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. आनंदाचा शिधा बंद करण्याचे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गतवर्षी महायुती सरकारने गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला होता. गणेशोत्सव हा हिंदूंचा सण असल्याने हा आनंदाचा शिधा देण्यात आल्याचे त्यावेळी एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने सांगितले होते. सरकारच्या माध्यमातून लोकांना मदत करत असल्याचे शिंदेंकडून सांगण्यात आले. मात्र, हे सर्व खोटे होते, केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांची मते मिळविण्यासाठी त्यावेळी आनंदाचा शिधा वाटण्यात आला होता हे आता सिद्ध झाले आहे. कारण या वर्षीच्या गणेशोत्सवात हा आनंदाचा शिधा अद्यापपर्यंत वाटण्यात आलेला नाही. त्यावेळी ज्यांनी आनंदाच्या शिध्याची घोषणा केली होती तेच सर्वजण सत्तेत आहेत. मात्र, यावर्षी आनंदाच्या शिद्याचा जाणीवपूर्वक विसर सत्ताधाºयांना पडला आहे. याचा आम्ही हिंदू म्हणून तीव्र निषेध व्यक्त करतो. आनंदाचा शिधा योजनेत आनंद दिघेंचे नाव असल्याने हा शिधा देण्यात आला नाही का? की सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून हा शिधा दिला नाही का? की केवळ निवडणुकीपुरतेच महायुतीच्या सत्ताधाºयांना हिंदू आणि हिंदूंचे सण आठवतात का? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे, असे आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे.