दोडामार्ग : उमेश फालेच्या खुनाचा तपास दोडामार्ग पोलिस योग्य प्रकारे करीत नसल्याने आम्ही घरातील सर्वजण दुःखी झालेलो आहोत. आमचे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या खुनाचा तपास सीआयडीकडे द्यावा व आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा मयतच्या पत्नी व मुलांसह आम्ही सर्व कोणत्याही क्षणी येथील पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा मयत उमेश फालेचे काका संतोष फाले यांनी सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, पुतण्या उमेश फालेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत उमेश फालेच्या खून प्रकरणात आम्हा फाले कुटुंबियांना न्यायाची अपेक्षा आपल्या पोलिस विभागाकडून आहे. या खुनात तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र या आरोपींकडून मयत उमेश फाले याच्या मृतदेहाची उकल अद्याप झालेली नाही. येथील पोलिस ठाण्याचे पोलिस व अधिकारी हे गुन्ह्याचा तपास करीत असून संशयितांनी माझ्या पुतण्याचा खून करून त्यावेळी त्याचा मृतदेह कालव्यात टाकल्याची कबुली दिलेली आहे. त्यानुसार पोलिसांनी तसेच आम्हीही कालव्यात मृतदेहाचा कसून शोध घेतला. परंतु मृतदेह सापडला नाही.
या कालव्यावर दहा दे बारा ठिकाणी आंघोळीचे ठिकाणे आहेत. जेथे लोक आंघोळीसाठी येतात, तसेच या कालव्यावरून नेहमी लोकांची ये-जा असते. त्यामुळे जर खरच मृतदेह कालव्यात टाकला असता तर त्याची दुर्गंधी आली असती. मात्र तसे झाले नाही. संशयित आरोपीला पोलिस कोठडीत घेऊन त्यांच्याकडून मृतदेहाची कोणत्या ठिकाणी विल्हेवाट लावली याबाबत दोडामार्ग पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी पुन्हा चौकशी करण्याकरीता योग्य ते आदेश द्यावेत. म्हणजेच जेणेकरून माझ्या पुतण्याच्या मृतदेहाची कोठे विल्हेवाट लावली याची माहिती मिळेल. हि माहिती गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने महत्वाची आहे. पुतण्याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी राजाराम गवस याच्याबरोबर माझा पुतण्या उमेशला त्याच्या पत्नी व माझ्या मुलाने शेवटचे पाहिले होते. तरी त्यांचे जबाब नोंदवून योग्य तो तपास करावा. माझ्या पुतण्याच्या खूनाचा तपास दोडामार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस योग्य रितीने करीत नसल्याने आम्ही घरातील सर्वजण निराश व दुःखी झालेलो आहोत व आम्हाला मानसिक त्रास होत आहे. माझ्या पुतण्याच्या मृतदेहाची उकल लागणे ही पुढील धार्मिक विधीकरीता आमच्यासाठी फार महत्वाची असल्याने संशयित आरोपींकडून गुन्ह्याची कबुली होऊनही मृतदेहाची उकल लागत नसल्याने आम्ही घरातील सर्वजण निराश आहोत. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा व आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा आम्ही मयत उमेशच्या पत्नी व मुलांसह येथील पोलिस ठाण्यासमोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करणार असल्याचा इशारा संतोष फाले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
अन्य साथीदाराचा सहभाग असल्याचा संशय
कालव्यात मृतदेह टाकला नसून त्याची अन्य कोणत्यातरी दुसऱ्या मार्गाने विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे संशयित आरोपींनी कालव्यात मृतदेह टाकल्याची खोटी कबुली दिलेली असून त्यांनी पुतण्या उमेशचा मृतदेह जंगलात, खोल दरीत किंवा एखाद्या निर्जन स्थळी जाळून टाकला असावा असा दाट संशय आहे. या खून प्रकरणात आणखीन कोणाचातरी हात असल्याचा संशय व्यक्त करत संशयित आरोपींचे सिमकार्ड, कॉल रेकोर्ड तपासून योग्य तो तपास करण्याच्या सुचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे संतोष फाले यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.