
कणकवली : कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने रस्त्यालगत काँक्रीट गटार बांधकाम व स्ट्रीट लाईट उभारणीच्या कामांचा शुभारंभ कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला. नागरिकांनी नगरपंचायतीवर टाकलेल्या विश्वासाचे हे फलित असून शहराच्या विकासासाठी नगरपंचायत कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले.
शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील छत्रपती शिवाजी चौक ते मराठा मंडळ रोडच्या डाव्या बाजूला स्ट्रीट लाईट उभारणीचे काम तसेच जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय ते बाजारपेठ स्मशानभूमी या रस्त्यालगत काँक्रीट गटार बांधकामाचा शुभारंभ नगराध्यक्ष संदेश पारकर व येथील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग परब यांच्या हस्ते तावडे कंपाऊंड समोर करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, गटनेते रुपेश नार्वेकर, नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, मधुसुदन उर्फ भाई परब, प्रसाद अंधारी,निकित मुरकर,किशोर सोगम, मनोज हिर्लेकर, गोविंद डिचोलकर, प्रकाश माने, गौरेश डिचोलकर, अक्षय परब, राज विचारे, रवी विचारे, उत्तम सुद्रिक, रवी भंडारे, लक्ष्मण हन्नीगोड, अमित धुमाळे, नगरपंचायतीचे अधिकारी सचिन नेरकर, विभव करंदीकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून नगरोत्थान निधीतून अंदाजे 9 लाख 99 हजार 514 रुपये खर्चून स्ट्रीट लाईटचे काम तर सुमारे 49 लाख 94 हजार रुपये खर्चून काँक्रीट गटार बांधकाम हाती घेण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार या कामांना प्रारंभ करण्यात आला असून उर्वरित मागण्यांचाही पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी यावेळी दिले.










