राष्ट्रीय जल महोत्सवात परुळेबाजार ग्रामपंचायतीचा गौरव

सरपंच प्रणीती आबंडपालकर यांना नवी दिल्लीत निमंत्रण
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 10, 2026 20:58 PM
views 22  views

सिंधुदुर्गनगरी :  केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत ८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत देशभर राष्ट्रीय जल महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींकडून नामांकन मागविले होते. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे.


१०० टक्के वापरकर्ता शुल्क वसुलीद्वारे नळपाणी योजनेची आर्थिक शाश्वतता साधणे आणि त्या प्रक्रियेत सरपंचांचा सक्रिय सहभाग या घटकांतर्गत परुळेबाजार गावाने आदर्श कामगिरी केल्याने ही निवड झाली आहे.


या निवडीमुळे ग्रामपंचायत परुळेबाजारच्या सरपंच प्रणीती आबंडपालकर यांना दि. ११ मार्च रोजी नवी दिल्ली येथील Vigyan Bhavan येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला आहे. हा कार्यक्रम Droupadi Murmu यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.


जल जीवन मिशन हा ग्रामीण भारतासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असून प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला गुणवत्तापूर्ण, नियमित व शाश्वत पिण्याचे पाणी घरगुती नळ जोडणीद्वारे उपलब्ध करून देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ८ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यात जल महोत्सवाचा विशेष पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.


सध्याच्या काळात पाणी ही केवळ पायाभूत सुविधा न राहता ग्रामीण जीवनशैली, स्थानिक परंपरा, उपजीविका आणि सामुदायिक संस्कृतीशी निगडित जीवनरेखा बनली आहे. जल जीवन मिशनमुळे सुरक्षित व नियमित पाणीपुरवठ्याच्या शाश्वत व्यवस्थेकडे ग्रामीण भागाची वाटचाल सुरू झाली आहे.


ग्रामपंचायत परुळेबाजारचा हा सन्मान म्हणजे जल जीवन मिशन अंतर्गत योजनांचे दीर्घकालीन संचालन, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे प्रभावी नियोजन तसेच जलसाक्षरता व लोकसहभागाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. इतर गावांनीही परुळेबाजारचा आदर्श घ्यावा, असे मत जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी व्यक्त केले.