
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावे या मागणीचे निवेदन तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांनी येथील पोलीस ठाण्यात दिले आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, दोडामार्ग तालुका हा गोवा व कर्नाटक राज्याला महाराष्ट्राशी जोडणारा शेवटचा आणि महत्वाचा तालुका आहे. दोडामार्ग तालुक्याची ओळख हा पर्यटन तालुका म्हणुन आज सगळीकडे आहे. पण हळुहळु ही ओळख बदलत चालली आहे. आज या तालुक्यात सगळीकडे अनेक अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालु आहेत. दारु, जुगार, मटका हे धंदे तर चालुच आहेत, पण चरस, गांजा सारख्या व्यसनामुळे तरुण पिढी देशोधडीला लागली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होत आहेत. आताची तरुण पिढी अशा प्रकारच्या व्यसनामध्ये गुंतली गेली आहे. तालुक्यात राजरोजपणे हे धंदे चालु आहेत. यावर अंकुश ठेवण्याचे काम हे पोलिस प्रशासनाचे आहे. असे असून या सर्व गोष्टींवर काहीच कारवाई होत नाही. इतर धंद्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता तर वाढत आहे. पण चरस, गांजा, अफु यांच्या सेवनामुळे पुर्ण कुटुंबच देशोधडीला लागत आहे.
तरी या सर्व प्रकारणांची सखोल व रीतसर चौकशी होऊन या प्रकरणाच्या पाठीशी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा गणेश चतुर्थीनंतर पोलिस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार आहे, असे भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दौलतराव देसाई, दोडामार्ग हेल्पलाइन ग्रुप अध्यक्ष वैभव इनामदार, भाजपा महिला तालुका उपाध्यक्ष आकांक्षा शेटकर, कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष जयप्रकाश भावे, कळणे सरपंच अजित देसाई, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, कुंब्रल उपसरपंच अमित सावंत, प्रकाश गवस, चंद्रशेखर देसाई यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.