
सावंतवाडी : ओटवणे मांडवफातरवाडी येथील श्री सती देवी मंदिरात गुढीपाडव्याच्या वार्षिक महोत्सवातील वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली. या वारकरी दिंडीत वारकरी वेशात आबालवृद्धांनी ठेका धरीत सर्वांचेच लक्ष वेधले. सोबतीला भालावल येथील वारकरी भजन मंडळाच्या अखंड हरिनामामुळे या दिंडीची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. सती मंदिरातील गुढीपाडव्याच्या वार्षिक उत्सवानिमित्त सालाबादचे धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी मुलांचे विविध मनोरंजनात्मक खेळानंतर शतदीप सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर महिला फुगड्या सादर करीत रसिकांचे मनोरंजन केले. त्यानंतर मुलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रसिकांना मोहिनी घातली. त्यानंतर ओटवणे गावठणवाडी येथील कुळकर प्रासादिक भजन मंडळाचे बुवा मयूर गावकर आणि सहकारी यांच्या सुश्राव्य भजनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेला 'पुरुषाच्या भागग्यापेक्षा स्त्री चरित्र थोर' हा बाल दशावतार नाट्य प्रयोग यादगार ठरला.
रात्री पारंपारीक वारकरी दिंडीत आषाढीची प्रतिकात्मक वारी काढण्यात आली. त्यात विठ्ठल व रुक्मिणीचे तसेच संत परंपरेतील संतांचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी वेशभूषा या दिंडीच्या केंद्रस्थानी होती. तर लहान मुले व युवक युवतींसह ग्रामस्थ व महिला वारकरी वेशभूषेत होते. सर्वांच्या वारकरी वेशातील सहभागामुळे ही वारकरी दिंडी न भूतो न भविष्यती ठरली. यावेळी उपस्थित सर्वांनीच विठ्ठल नामाचा ठेका धरत टाळ, मृदुंग व अभंगाच्या गजरात संपूर्ण मांडवफातरवाडी भक्तिमय वातावरणात दुमदुमून निघाली.
दरम्यान या महोत्सवात हजारो भाविकांनी सती देवीचे दर्शन घेतले. या कार्यक्रमात रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या वार्षिक महोत्सवाचे सती देवी कला क्रीडा मंडळ आणि मांडवफातरवाडीवासियांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. या वार्षिक महाउत्सवानिमित्त संपूर्ण मांडवफातरवाडीच्या उत्साहाचे वातावरण होते.