
कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यालगत असणाऱ्या पोलीस वसाहती मध्ये नवीन इमारत भावी यासाठी शासन स्तरावर गेली कित्येक वर्ष पाठपुरावा सुरू आहे तरी देखील अजून प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने पोलिसांना वसाहती मधील इमारतीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचा-यांसाठी दर्जेदार निवास व्यवस्था व्हावी यासाठी तात्कालिन पोलिस अधिक्षक दिक्षीत कुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य गृहविभागाकडे नव्या वसाहती उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तात्कालिन गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी त्या अनुषंगाने पोलीस वसाहतींना भेटी देत लवकरात लवकर पोलीस वसाहती उभारण्याचे आश्वस्त केले होते. मात्र पोलिसांच्या नव्या वसाहतींचा प्रस्ताव धुळखात पडला आहे. कणकवली पोलीस ठाण्यातील जुन्या वसाहतींमधील 9 इमारतींची अवस्था धोकादायक झालेली आहे. या धोकादायक पोलीस वसाहतीमधील इमारतींचा निर्लेखणाचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्याकडे पालकमंत्री रविंद्र चव्हाण , स्थानिक आ. नितेश राणे लक्ष देतील का ? असा प्रश्न उपस्थित होता.
कणकवली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचा-यांना वसाहतींची दुरावस्था झाल्यामुळे बाहेर व्यवस्था करुन राहावे लागत आहे. सध्या कणकवली पोलीस ठाण्यात 6 अधिकारी व 60 कर्मचा-यांची मंजुर पदे आहेत. या कर्मचा-यांना पोलीस ठाण्या लगत असलेल्या वसाहतीत राहता येत नाही. कलमठ सर्वे नं. 165 ब 4 क्षेत्र 74 गुंठे असा परिसर पोलिस ठाण्याचा आहे. या ठिकाणी जुन्या वसाहतीच्या 9 इमारतींमध्ये 36 खोल्या आहेत. या खोल्यांची छपरे कोसळलेली आहेत. तसेच दरवाजा , खिडक्या तुटलेल्या आहेत. या वसाहतीतील घरांच्या आजुबाजुला मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. या धोकादायक इमारतीमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी राहत नाहीत. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून संबंधिक विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच तिथे वसाहतीला असलेली नळपाणी व्यवस्थाही बंद पडली आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यात सेवा बजावत असलेल्या कर्मचा-यांना राहण्यासाठी पर्यायी स्वरुपाची व्यवस्था करताना दमछाक होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांना दर्जेदार वसाहत होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पोलीस ठाण्यालगत असलेल्या जुन्या वसाहतीमधील 9 इमारती निर्लेखीत करण्याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नव्याने पोलीस वसाहत उभारण्याची गरज आहे. त्यामुळे कणकवली पोलीस ठाणे हद्दीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध होऊ शकेल. पोलीस ठाणे शहरातच असल्यामुळे कुटुंबियांसाठी शिक्षण , आरोग्य , बाजारपेठ या सेवा जवळच उपलब्ध होतील. 74 गुंठ्याचा परिसर असल्याने मुलांसाठी व कुटुंबियांसाठी खेळ , मैदानासाठी पुरेशी जागा आहे. शासनाने तातडीने त्यावर गांभीर्यपुर्वक उपाययोजना करण्याची गरज आहे.
कणकवली पोलीस निरिक्षक अमित यादव यांनी सांगितले की
कणकवली पोलीस ठाण्यात पोलीसांसाठी असलेल्या वसाहतीच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत . त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्या वसाहती मध्ये राहत नाहीत. या ठिकाणी पोलीसांसाठी चांगली वसाहत उभारल्यास तातडीच्या वेळी पोलीस फौज फाटा उपलब्ध होईल . शहरातच जागा असल्यामुळे कुटुंबियांना सर्व सोयी सुविधा मिळतील अशी प्रतिक्रिया कणकवली पोलीस निरिक्षक अमित यादव यांनी दिली.
शासनाकडे निर्लेखनाचा प्रस्ताव पाठवला असल्याचे सार्वजनिक बांधकाम कनिष्ठ अभियंता राहुल पवार यांनी कणकवली पोलीस ठाण्यातील नादुरुस्त इमारतींबाबत पोलीस अधिक्षक यांच्या पत्रानुसार आमच्या विभागाने पाहणी करुन निर्लेखनाचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवलेला आहे. पुढील कार्यवाही बाबत कळवल्यानंतर संबंधित इमारतींबाबत निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम कणकवली राहुल पवार यांनी दिली.