
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा जिल्हा व्यापारी एकता मेळावा उद्या ३१ जानेवारी रोजी मालवण येथील बोर्डिंग मैदानावर होणार असून या मेळाव्यात प्रदान होणाऱ्या पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा आज जिल्हा व्यापारी महासंघाकडून करण्यात आली. यातील सात पुरस्कारपैकी पाच पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली तर अन्य दोन पुरस्कार विजेत्यांची घोषणा मेळाव्यात होणार आहे. यामध्ये जिल्हा व्यापारी महासंघातर्फे देण्यात येणारा मानाचा जीवनगौरव पुरस्कार मालवण मधील ज्येष्ठ व्यापारी आणि मालवण तालुका व्यापारी संघांचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर यांना जाहीर झाल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे व्यापारी मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी व्यापारी महासंघाच्या पुरस्कार विजेत्यांबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, कणकवलीचे तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, कणकवलीचे सहकार्यवाह श्री. राजाध्यक्ष, देवगड तालुकाध्यक्ष शैलेश कदम आदी उपस्थित होते.
जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुरस्कार निवड समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे. यातील सात पुरस्कारांपैकी पाच पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये व्यापारी संघात भरीव योगदानासाठी आयोजक तालुक्यातील ज्येष्ठ व्यापाऱ्यास देण्यात येणारा मानाचा जीवन गौरव पुरस्कार मालवणचे प्रमोद ओरसकर यांना जाहीर करण्यात आला. तसेच
कै.माई ओरसकर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार ज्येष्ठ हॉटेल उद्योजिका सुरेखा वाळके यांना, कै.प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार खारेपाटण व्यापारी संघटना यांना, कै.बि.एस. तथा भाईसाहेब भोगले स्मृती ग्रामिण नव उद्यमी पुरस्कार नांदोस कट्टा येथील विघ्नेश मार्केटिंगचे
महेश यादव यांना, तर सेवाव्रती श्री.बापू नाईक स्मृती स्वयंसिद्ध सेवा उद्यमी पुरस्कार सावंतवाडी आंबोली येथील व्हिसलींग वूडस् चे हेमंत ओगले यांना जाहीर करण्यात आला. तर आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार व कै. उमेश विष्णू शिरसाट आदर्श कार्यकर्ता पुरस्कार या दोन पुरस्कारांची घोषणा उद्या व्यापारी मेळाव्याच्या कार्यक्रमात होणार आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करून सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती नितीन वाळके यांनी दिली.