
चिपळूण : शहरातील कावीळतळी येथील वृषाली सावंत यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि मुंबई येथे नोंदणी करून वकील पदवी प्राप्त केली आहे. सिद्धयोग विधी महाविद्यालय, खेड येथून त्यांनी प्रथम श्रेणीत कायद्याचे शिक्षण पूर्ण केले असून, विधी व्यवसायात त्या नव्याने पदार्पण करत आहेत.
वृषाली सावंत यांनी शिक्षणासोबत घरगुती जबाबदाऱ्या पार पाडत स्वतःच्या मेहनतीने, चिकाटीने आणि अभ्यासू वृत्तीने हे यश मिळवले आहे. महिलांनी ध्येयपूर्तीसाठी जिद्दीने वाटचाल केल्यास यश सहज शक्य आहे, हे त्यांनी आपल्या स्वअनुभवातून दाखवून दिले आहे.
त्यांच्या या यशाचे विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांकडून कौतुक होत असून, त्या लवकरच न्यायालयीन कामकाज सुरू करणार आहेत. ग्रामीण भागातून येऊनही त्यांनी प्राप्त केलेली ही वकील पदवी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.