८५ वर्षांवरील - दिव्यांग मतदारांना घरीच करता येणार मतदान !

Edited by: संदीप देसाई
Published on: November 07, 2024 20:23 PM
views 182  views

 सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणेने नियोजन केले आहे. भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील व दिव्यांग मतदार जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत. त्यांच्यासाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार २६९- कुडाळ विधानसभा मतदार संघात ६३४ मतदारांनी निवडणूक यंत्रणेकडे अर्ज भरून दिले आहे. या मतदारांसाठी १५ ते  १७ नोव्हेंबरला संबंधितांच्या घरी जावून मतदान घेण्यात येणार आहे. अशी माहिती कुडाळ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे यांनी दिली आहे.

       याकरीता कुडाळ विधानसभा मतदार संघातील ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे, दिव्यांग मतदारांची आपआपल्या कार्यक्षेत्रातील बीएलओंनी नोंद करून अर्ज भरून घेतले आहेत. यापैकी मतदान केंद्रात जावून मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांची संख्या ६३४ एवढी आहे. यात ८५ वर्षावरील ५७४ मतदार असून ६० दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. या सर्व दिव्यांग व वृद्ध मतदारांच्या घरी जावून मतदान घेतले जाणार आहे. यासाठी कुडाळ विधानसभा मतदार संघात १५ ते  १७ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यासाठी ३५ पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकामध्ये दोन मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी, एक सूक्ष्म निरिक्षक तर एक व्हीडीओग्राफर अशी ५ कर्मचाऱ्यांची टीम असणार आहे.

      तरी कुडाळ विधानसभा मतदार संघातील ज्या ८५ वर्षावरील व दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंद केली आहे त्यांनी याची नोंद घेऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा. तसेच यादिवशी मतदार अनुपस्थित असल्यास त्यांना गृह मतदानाची संधी नसेल असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे, सहाय्यक निवडणूक अधिकारी विरसिंग वसावे, श्रीमती शितल जाधव यांनी कळविले आहे.