
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचेच नव्हे तर जगाचेही नेतृत्व करू शकतात. नितेश राणे हे पालकमंत्री आहेत, मत्स्य विभागाचे प्रश्न तेच सोडवू शकतात. तर नारायण राणे खासदार आहेत त्यामुळे भाजपाला मत म्हणजे खासदार नारायण राणे यांना मत. त्यामुळे घराघरात जाऊन भाजपाचा प्रचार करा असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मालवण येथे बोलताना केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे बुधवारी रात्री मालवण येथे आले होते. यावेळी प्रत्येक प्रभागातील उमेदवारांशी त्यांनी वैयक्तिक बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अशोक सावंत, अशोक तोडणकर, रणजीत देसाई, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, राजू परूळेकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिल्पा खोत यासंह सर्व उमेदवार कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजपने केलेलं कार्य जनतेपर्यंत घेऊन जावे. कोरोना काळात दिलेल्या लसींमुळे हजारोंचे जीव वाचले होते. ही लस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी मोफत उपलब्ध करून दिलेली होती. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांतून जनतेला होत असलेल्या फायदा हाही सर्वांना सांगणे आवश्यक आहे. देशात, राज्यात आणि शहरात एकच सत्ता असल्यास आपण जोमाने शहर विकास करू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात भाजपची असलेली ताकद यामुळे आम्हाला खरंतर बाय मिळणे आवश्यक होते. काही लोक कशाला मते मागत आहेत, हेच समजून येत नाही. आपले मत फुकट जावू नये म्हणून कार्यकर्त्यांनी भाजपला मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत. मत्स्यद्योग खाते हे नितेश राणे यांच्याकडे असल्याने याठिकाणच्या मच्छीमारांचे तसेच इतरही प्रश्न सोडविण्याची क्षमता भाजपमध्ये आहे. यामुळे या निवडणुकीत भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने मतदारांपर्यंत पोहचून भाजपचे काम पटवून दिले पाहिजे, असेही श्री. चव्हाण म्हणाले.











