
कणकवली: कणकवली युवासेनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे कणकवली पटकीदेवी मंदिर ते श्री देव स्वयंभू मंदिर,नागवे, करंजे रस्ता खडीकरण डांबरीकरणाचे काम १६ फेब्रुवारी रोजी पासून सुरु करण्यात आले आहे. या १२ किमी रस्त्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.सध्या नागवे येथे हे काम सुरु आहे. त्यामुळे जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई यांनी सुरु झालेल्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनाचे इशारे देऊन कणकवली करांची दिशाभूल करू नये. आंदोलनाचा इशारा देऊन दिशाभूल करण्यापेक्षा आधी कामाची सद्यस्थितीची माहिती घ्यावी. असा टोला युवासेना कणकवली तालुका समन्वयक तेजस राणे यांनी लागवला आहे.
या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन २ महिने झाले तरी काम सुरु झाले नव्हते त्यामुळे कणकवली तालुका युवासेनेने १० फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची भेट घेत रस्ता सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.त्यावर श्री. सर्वगोड यांनी ८ दिवसात काम सुरु करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे त्यांनी १६ फेब्रुवारी पासून काम सुरू करून घेतले. रखडलेले हे काम युवासेनेच्या पाठपुराव्या मुळे मार्गी लागले आहे. ठेकेदाराने नागवे येथून हे काम सुरु केले आहे. त्यामुळे आधीच सुरु झालेल्या रस्त्यासाठी विठ्ठल देसाई यांनी हे आंदोलन न करता आपले आंदोलन राखून ठेवावे. दुसऱ्या एखाद्या रस्त्यासाठी त्यांच्या आंदोलनाचा उपयोग होईल असाही टोला तेजस राणे यांनी लागवला आहे.