
कणकवली : स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व निवृत्त ग्रामसेवक श्री. विश्वनाथ विठ्ठल केरकर (वय 80) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मुळचे उभादांडा (वेंगुर्ले)चे रहिवासी असलेले केरकर निवृत्तीनंतर शिक्षक कॉलनी, तरंदळे रोड, कणकवली येथे स्थायिक झाले होते. स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष कै. प्राचार्य महेंद्र नाटेकर यांच्या चळवळीत ते सातत्याने अग्रभागी राहिले.
कणकवली तालुका सेवानिवृत्त संघटनेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कणकवली येथील पेन्शनर भवनच्या उभारणीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. कणकवली येथील माधुरी महेंद्र प्रतिष्ठानचे ते विश्वस्त होते. ग्रामसेवक म्हणून त्यांनी परुळे कुशेवाडा, परुळे बाजार, भोगवे, वजराट, पिसेकामते, आशिये, लोरे, कुर्ली घोणसरी, नांदगाव, ओसरगाव येथे सचोटी आणि कर्तव्यनिष्ठेने काम पाहिले. त्यांना भजनाची आवड होती व ते उत्तम तबलावादक होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन विवाहित मुली, नातवंडे आणि मोठा मित्रपरिवार आहे. कणकवली येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.