विशाळगडावरील 'त्या' घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करा !

वैभववाडी मुस्लिम समाजाची मागणी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 19, 2024 13:19 PM
views 129  views

वैभववाडी :  विशाळगडावरील हजरत मलिक दर्ग्यासह गजापुर येथे अमानुष प्रकारे हल्ला करण्यात आला. यामध्ये मुस्लीम आणि हिंदु समाजातील महिला आणि लहानमुलांवर दगडफेक करून जखमी करणाऱ्यात आले.या प्रकाराचा निषेध नोंदवित त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी येथील मुस्लीम समाजाकडुन करण्यात आली आहे. मुस्लीम समाजाने येथील तहसिलदारांना निवेदन दिले.यावेळी एस.एम.बोबडे,अजीम बोबडे, हुसेन लांजेकर,रज्जब रमदुल,हसन रमदूल,आलिवा बोथटे,आयुब बोबडे,इम्तीयाज पाटणकर यांच्यासह शेकडो मुस्लीम बांधव उपस्थित होते.

१४ जुलैला विशाळगडावरील हजरत मलिक रेहान यांच्या दर्ग्यावर काही विघ्नसंतोषी जमावाने दगडफेक केली या दगडफेकीत मुस्लीम समाजातील महिला तसेच हिंदु समाजातील महिला लहान मुले तसेच स्थानिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.याशिवाय गडावर राहणाऱ्या लोकांची घरे उध्वस्त केली आहेत.याशिवाय विशाळगडापासुन सहा किलोमीटर अतंरावर असलेल्या गजापुर येथील मुस्लीम समाजाची बंद घरे फोडुन अज्ञात जमावाने प्रापंचिक साहीत्याची नासधुस केली आहे.घरातील जीवनाश्यक वस्तुची नासाडी केलेली आहे.छत्रपती शिवाजी महाराजानी रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही असे असताना काही माथेफिरूनी महाराजाच्या गडावर संविधान आणि कायदा धाब्यावर बसवून हा प्रकार केला आहे.या सर्व प्रकाराचा आम्ही निषेध करीत असुन या प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी.ज्यांची घरे उध्वस्त केली आहेत त्यांना शासनाने पाच लाख रूपये मदत करावी अशी मागणी देखील केली आहे.