
वेंगुर्ला : वेंगुर्लेतील हिंदू धर्माभिमानी नागरिकांच्या वतीने मराठी नवीन वर्ष गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या नागरिकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि धार्मिक घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या स्वागत यात्रेला भाजपचे युवा नेते विशाल परब व सौ. वेदिका परब प्रमुख उपस्थिती म्हणून लाभली. त्यांनी यात्रेत सहभागी होत नागरिकांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता व संस्कृतीचे जतन होते, असे मत व्यक्त केले.
यात्रेची सुरुवात श्री देव रामेश्वर मंदिर येथून करण्यात आली असून शिरोडा नाका, दामले नाका, मार्केट, मारुती मंदिर मार्गे पुन्हा रामेश्वर मंदिर येथे समारोप करण्यात आला. कार्यक्रमात महिला, युवक व लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. हिंदू धर्मीय बांधवांनी पारंपरिक पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. या कार्यक्रमामुळे संपूर्ण वेंगुर्ला शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.










